महागड्या गाड्यांमध्ये बसून पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक; मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News: मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात पोलिसांनी पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक केली आहे. पाकिटमारी करणारे सरपंच आणि पंच यांनी एक टोळीच तयार केली होती. सरपंचांची ही टोळी पाकिटमारी करण्यासाठी महागड्या कारमध्ये फिरत असत. महागडी गाडी घेऊन ते गर्दीच्या ठिकाणी जात असत आणि पाकिटमारी करायचे. पोलिसांना आरोपींकडे खिसे कापण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड, कटर आणि 1 लाख 17 हजार रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक टियागोही जप्त केली आहे, जिचा वापर ते चोरी करताना करत होते. बडवानी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वांना कोर्टात हजर करण्यात आलं. सर्व आरोपी धार जिल्ह्याचे आहेत. 

बडवानी येथे राजकीय कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचा रोड शो तसंच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाकिट आणि मोबाईलची चोरी होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारींचं प्रमाणा वाढत असल्याने बडवानी पोलिसांनी या चोरी रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं. पोलिसांच्या पथकाला एका खबरीकडून कुक्षी हाट बाजारात काही पाकिटचोर दिसल्याची माहिती मिळाली. हे चोर चोरीच्या तयारीतच होते. 

दरम्यान, खबरीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांचं पथक कुक्षी हाट बाजारात पोहोचलं आणि चार तरुणांना घेराव घालत ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींची चौकशी करता आणि तपासणी केली असता त्यांच्याकडे ब्लेड, कटर आणि चाव्या सापडल्या आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत आणि रोड शोमध्ये पाकिटमारी केल्याचा गुन्हा कबूल केला. तसंच 1 लाख 17 हजारांच्या रोख रुपयांसह एक टियागो कारही जप्त केली आहे. 

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी सोनू शितोले यांनी सांगितलं की, पकडलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. यामध्ये धार जिल्ह्याच्या देवधा येथील रहिवासी सुभान भूरिया याचा समावेश आहे. सुभान भूरिया हा देवधा गावाचा सरपंच आहे. 

सुभान भूरिया याच्यासह त्याचे वडील बेडिया भुरिया (40), मोहन सिंह चौहान (25), भारतसिंह बामनिया (24) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्वांना अटक केली असून, त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान गावचा सरपंच आणि पंच चोरीत सहभागी असल्याची माहिती समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली असून, सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

Related posts