बाईकवरुन खाली पडले म्हणून बाप आणि मुलगा मदतीसाठी धावले, पण पुढे भलतच घडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गरजेला किंवा अडचणीत असताना एखाद्याच्या मदतीला धावणं हा माणसाचा स्वभाव आहे. आता प्रत्येकजण मदतीला धावतोच असं नाही. पण काहीजण मदतीला न धावण्यामागे कदाचित अशी काही कारणं असतात ज्याचा भूतकाळात घडलेल्या घटनांशी संबंध असावा. छत्तीसगडच्या रायपूरमधील एका बाप आणि मुलालाही असाच अनुभव आला आहे, जो पाहता ते भविष्यात कोणाची मदत करताना दहावेळा विचार करतील. याचं कारण दुचाकीचा तोल गेल्याने दोन व्यक्ती खाली पडले असता मुलगा आणि वडिलांनी मदतीला धाव घेतली होती. पण पुढे जे काही झालं त्याचा विचारही त्यांनी केला नव्हता. याचं कारण ही दुचाकी जाणुनबुजून खाली पाडण्यात आली होती. मदतीला आलेल्या दोघांनाही चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आलं. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरस्वती नगर परिसरात ही घटना घडली. सीसीटीव्हीत मध्यरात्रीच्या सुमारास दोन व्यक्ती दुचाकीवरुन खाली पडत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, हे सर्व योजना आखून करण्यात आलं होतं. आरोपीन मागे वळून पाहिलं असता पीडित दुचाकीवरुन येत असल्याचं त्याने पाहिलं. यानंतर त्याने तोल जाऊन आपली दुचाकी खाली पडत असल्याचा बनाव केला. 

पीडित आरोपींच्या मागून बाईकवरुन चालले होते. बाईक खाली पडलेली पाहताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. ते आरोपींना उठण्यासाठी मदत करत असतानाच एक आरोपी मागे उभा राहून चाकू बाहेर काढतो. मदत केल्यानंतर मुलगा आणि वडील परत जात असतानाच एक आरोपी त्यांना बाजूला घेतो आणि चाकूचा धाक दाखवतो.

यावेळी मुलगा पळून जातो, पण चोर त्याच्या वडिलांना पकडतात आणि खाली जमिनीवर पाडतात. पण दोघे लढतात आणि चोरांकडून सुटका करुन घेतात. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अजून कोणालाही चाकूचा धाक दाखवत धमकावत असल्याचं दिसत आहे. नंतर ते घटनास्थळावरुन पळ काढतात. 

आरोपी चोर आणि पीडितांची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेबाबत चौकशी केली. पण त्यांच्या हाती जास्त माहिती लागली नाही. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सीसीटीव्ही फार स्पष्ट नसल्याने दुचाकीची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नाही आहे. त्यामुळे पीडित आणि आरोपी यांचा शोध घेणं कठीण आहे. पण पोलीस अद्याप याप्रकरणी तपास करत आहेत. 

Related posts