( प्रगत भारत । pragatbharat.com)
Eco Friendly Ganpati Decoration 2023: काहीच दिवसांत बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधी महिनाभर तयारी केली जाते ती म्हणजे मखर बनवण्याची. आपल्या घरातील मखर सगळ्यात आकर्षक असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. काही ठिकाणी तर आकर्षक मखर अशी स्पर्धाही घेण्यात येतात. पूर्वी थर्माकोलच्या मखर बाप्पासाठी आणले जायचे. मात्र, या मुळं प्रदूषणाची हानी होते. तसंच, बाप्पाच्या विसर्जनानंतर थर्माकोल नदीत किंवा तलावात टाकले जाते. त्यामुळं जलप्रदूषणाची भीती असते. अलीकडेच इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पुरक गणेशमूर्ती आणण्याकडे लोकांचा कल असतो. तसंच, बाप्पाची आरासही इको फ्रेंडली करण्यात येते. टाकाऊ वस्तूंपासून बाप्पाचे मखर कसे बनवता येतील याच्या खास टिप्स पाहूयात.
इको फ्रेंडली मखर बनवण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसंच, युट्यूब व्हिडिओतूनही तुम्ही छान आयडिया मिळवू शकतात. अलीकडेच चांद्रयान-३ची चर्चा आहे. त्या आधारित थीमवरही तुम्ही बाप्पाचे मखर बनवू शकता. तसंच, घरात असलेल्या पुठ्ठ्यांचा वापर बनवून छान आरास करु शकता. बाप्पाचे इको फ्रेंडली मखर बनवण्यासाठीच्या खास आयडिया जाणून घेऊया.
चांद्रयान- ३ मखर
भारताने चंद्रावर झेप घेतली आहे. हे यश तुम्ही बाप्पाच्या साथीने साजर करु शकता. घरच्या घरी चांद्रयानची थीम घेउन मखर कसं करता येईल.
फुलांचा वापर करुन
सध्या फुलांच्या मखरांना भाविकांची चांगली पसंती आहे. बाजारात इको-फ्रेंडली साहित्यापासून तयार केलेल्या कृत्रिम फुलांचे मखरही अस्तित्वात आहे. फुलांपासून बनवलेले झुंबर, कमानी, रथ, अर्धचंद्र असे अनेक वेगवेगळे प्रकार सध्या उपबल्ध आहेत. या फुलांचा पुन्हा वापरदेखील करता येतो. काही ठिकाणी ताज्या फुलांपासूनही आरास केलेल्या कमानी मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी या कमानी भक्तांच्या हातात सोपवल्या जातात.
कागदाचा वापर करुन बनवा मखर
घरात दररोज येणारे वृत्तपत्र आपण एकतर रद्दीत देतो किंवा साफसफाई साठी वापरतो. मात्र, याच रद्दीचा वापर करुन तुम्ही बाप्पासाठी मखरही तयार करु शकणार आहात.
साड्यांचा वापर करुन बनवा मखर
गणरायासाठी साड्यांचा किंवा कापडाचा वापर करुन मखर तयार करता येऊ शकते. अगदी कमी खर्चात व आकर्षक असे मखर बाप्पाला छान शोभून दिसते. पैठणी, खण किंवा पारंपारिक साड्यांच्या मदतीने बाप्पासाठी सजावट करता येऊ शकते. बाप्पाच्या मागील बाजूस पैठणीचा पदराचा भाग शोभून दिसेल. साड्यांना पर्याय म्हणून ओढणी वापरू शकता. दोन ते तीन वेगवेगळ्या रंगाच्या सिल्क ओढण्यांच्या वापर करुन छान मखर बनवता येते.