मुस्लीम प्रार्थना म्हणण्याआधी खाल्लं डुकराचं मांस; लिना मुखर्जीला पोलिसांनी केली अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इंडोनेशियात एका मुस्लीम महिलेला ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर महिलेला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. महिलेने टिकटॉकला एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती बालीमध्ये सुट्ट्या घालवत असताना डुकराचे मांस खाण्यापूर्वी इस्लामिक प्रार्थना म्हणताना दिसली. 

सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, लिना मुखर्जी असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. मंगळवारी सुमात्रा बेटावरील पालेमबांग जिल्हा न्यायालयात तिच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयातील उपलब्ध कागदपत्रांनुसार, महिलेला ठराविक धर्म आणि विशिष्ट गटांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती पसरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे.

लिना मुखर्जीने केलेल्या दाव्यानुसार, बाली येथे प्रवास करत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. यामध्ये ती तेथील प्रसिद्ध स्ट्रीट फूड खाताना दिसत आहे. बाबी गुलिंग असं या डिशचं नाव असून त्यात भात, डुकराचे भाजलेले तुकडे आणि भाज्या असतात. व्हिडीओ शूट करताना ती कॅमेऱ्यासमोर बोलताना आणि तो पदार्थ खाताना दिसत आहे. 

व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. इंडोनेशियातील उलेमा कौन्सिल या देशाच्या सर्वोच्च मुस्लिम धर्मगुरूंच्या संघटनेसह धार्मिक गटांनी या व्हिडीओचा निषेध केला आहे. हा व्हिडीओ ‘निंदनीय’ असल्याचं ते म्हणाले आहेत.

कोर्टाने लिना मुखर्जीला 16 हजार 245 डॉलर्सचा दंड आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जर लिना मुखर्जीने दंड भरला नाही तर शिक्षा तीन महिन्यांनी वाढवली जाणार आहे. कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना लिना मुखर्जीने सांगितलं आहे की, “मला माहिती आहे की, मी चुकीचं केलं आहे. पण इतकी कठोर शिक्षा दिली जाईल इतकी अपेक्षा नव्हती”. सीएनएन इंडोनेशियाच्या वृत्तानुसार, लिना मुखर्जी शिक्षेला आव्हान देण्याची शक्यता आहे. 

लिना मुखर्जीचे सोशल मीडियावर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इंडोनेशिया हे जगातील सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र आहे. देशातील किमान 93 टक्के लोक मुस्लिम आहेत. 

डुकराचे मांस इस्लाममध्ये निषिद्ध आहे आणि बहुतेक इंडोनेशियन मुस्लिमांमध्ये ते खाणे निषिद्ध आहे. परंतु देशातील वांशिक चिनी लोकसंख्येसह तसेच बाली या हिंदू-बहुल बेटावर राहणाऱ्या लोकांसह लाखो गैर-मुस्लिम लोक सामान्यतः मांस खातात.

Related posts