[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Wrestlers Protest: अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी आज नव्या संसदेचं देशाला लोकार्पण होत असतानाच आंदोलक कुस्तीपटूंना रस्त्यावर अक्षरश: फरफटत नेत अटक केली आहे. महिला कुस्तीपटूंना ज्या पद्धतीने ताब्यात घेताना दिल्ली पोलिसांकडून वागणूक देण्यात आली त्यावरून देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. सोशल मीडियातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
नव्या संसदेच्या दिशेने कूच करताना ताब्यात घेतल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही शांततेने कूच करत होतो, मात्र त्यांनी आम्हाला जबरदस्तीने खेचून ताब्यात घेतले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आहे. आमच्या चॅम्पियन्सना ज्या प्रकारे वागणूक दिली गेली ते अतिशय लाजिरवाणे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, आप, शेतकरी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या वागणुकीचा निषेध करत मोदी सरकारवर सडकून प्रहार केला आहे. काँग्रेसकडून अहंकारी राजा अशी संभावना करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईनंतर हल्लाबोल केला आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करताना ‘राज्याभिषेक पूर्ण झाला, आता अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय’ अशा बोचऱ्या शब्दात वार केला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून पैलवानांच्या सुटकेची मागणी
पश्चिम बंगालच्या सीएम ममता यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंना ज्या प्रकारे मारहाण केली त्याचा मी तीव्र निषेध करते. आमच्या चॅम्पियन्सना अशी वागणूक दिली जाते हे लज्जास्पद आहे. लोकशाही सहिष्णुतेमध्ये असते. परंतु, निरंकुश शक्ती असहिष्णुता आणि मतमतांतरे दाबून फोफावतात. कुस्तीपटूंची पोलीस कोठडीतून तत्काळ सुटका करावी, अशी माझी मागणी आहे. मी पैलवानांच्या पाठीशी उभा आहे.
Reels
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्वीट करून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बाकीच्या पदकविजेत्यांसोबत झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खूप निराश आहे. या मुलींशी झालेल्या निंदनीय गैरवर्तनाने उत्तरदायित्वाची मागणी करत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना अशा पद्धतीने हाताळण्याची परवानगी दिली होती का? केंद्र सरकारने याची उत्तरे द्यावीत. ज्या खेळाडूंनी आपल्या देशाला खेळाच्या माध्यमातून सन्मान मिळवून दिला आहे, अशा खेळाडूंना न्यायासाठी अशा लढाया कराव्या लागतात, हे खरोखरच दुर्दैवी आहे. ज्या विजेत्यांचा सर्वांनी सत्कार केला तेच न्याय मागणारे अचानकपणे खलनायक आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
राकेश टिकैत म्हणतात,
शेतकरी नेते राकेश टिकैत यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पैलवान मुलींना बळजबरीने रस्त्यावर खेचणाऱ्या केंद्र सरकारला संसदीय शिष्टाचाराचा अवमान करून अभिमान वाटतो, पण आज राज्यकर्त्यांना मुलींचा आक्रोश ऐकू आला नाही. आमच्या मुलींची कोठडीतून सुटका होऊन न्याय मिळेपर्यंत शेतकरी गाझीपूर सीमेवर उभे राहतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाचा मान वाढवणाऱ्या आपल्या खेळाडूंसोबत असे वागणे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.
[ad_2]