( प्रगत भारत । pragatbharat.com)
COVID-19 Connection To A Brain Disease: कोरोना साथीच्या कालावधीमध्ये समोर आलेल्या हजारो प्रकरणांमध्ये असं लक्षात आलं आहे की कोरोनाने दिर्घकाळ प्रभावित असलेल्या रुग्णांना इतर आजारांचा धोकाही अधिक आहे. खास करुन मेंदूचे आजार आणि अगदी केस गळण्यापर्यंतच्या समस्या अशा रुग्णांना भेडसावू शकतात. आता आरोग्यविषय तज्ज्ञांना न्यूयॉर्कमध्ये एक असं प्रकरण आढळून आलं आहे ज्यामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रियन रोग या मेंदूसंदर्भातील आजारामुळे झाल्याची शक्यता आहे.
62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
माऊंट सिनाई क्वीन्स येथील डॉक्टरांनी, न्यूयॉर्कमधील या व्यक्तीच्या मेंदूला प्रियन रोगाचा संसर्ग होण्यामागे कोव्हिडचं योगदान अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भातील अहवाल ‘अमेरिकन जर्नल ऑफ केस’ या नियतकालिकामध्ये छापण्यात आला आहे. या अहवालामध्ये एका 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूसंदर्भातील सविस्तर तपशील आहे. या व्यक्तीला चालताना संतुलन बिघडणे, स्मृतीभ्रंश यासारखे त्रास जाणवू लागले. त्याला न्यू यॉर्कमधील माउंट सिनाई क्वीन्स हॉस्पिटल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याला मृत्यू झाला.
अहवालात नक्की काय म्हटलंय?
“आम्ही माउंट सिनाई क्वीन्स हॉस्पिटल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या 62 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूचा अभ्यास केला. या व्यक्तीला चालताना संतुलन बिघडण्यापासून ते मायोक्लोनसबरोबरच स्मृतीभ्रंश झाला होता. या व्यक्तीच्या मेंदूचा एमआरआय करण्यात आला. मात्र त्यामधून ठोस काही समजत नव्हतं. या व्यक्तीची सीएसएफ प्रोटीन 14-3-3 चाचणी करण्यात आली आणि त्याचा निकाल सकारात्मक आला. तपासामध्ये ही व्यक्ती बऱ्याच काळ कोरोना पॉझिटीव्ह होती. त्यामुळे तिच्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला. या रुग्णाची प्रकृती खालावत गेली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला,” असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. “हे प्रकरण न्यूरोडीजेनेरेटिव्ह आणि खास करुन प्रियन डिसीज संदर्भातील आहे. कोरोना संसर्गामुळे रुग्णाला प्रकृतीसंदर्भातील या समस्या उद्भवल्या आणि त्याचा प्रकृतीवर विपरित परिणाम झाला,” असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
तोंडातून लाळ गळू लागली अन्…
रुग्णालयामध्ये दाखल होण्याच्या 2 महिने आधी क्वीन्स येथे राहणाऱ्या या 62 वर्षीय रुग्णाच्या तोंडातून लाळ गळू लागली आणि त्याचा चालण्याचा वेग मंदावला. त्यावेळेस या रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य केंद्रावर उपचार करुन घरी सोडण्यात आलं. मात्र घरात चालताना ही व्यक्ती धडपडल्याने या व्यक्तीची चालण्याची क्षमता कमी होत असल्याचं चाचण्यांमध्ये समोर आलं. तसेच या व्यक्तीच्या बोलण्याचा वेगही मंदावला. रुग्णालयामध्ये दाखल केलं असता या व्यक्तीची कोरोना चाचणी सकारात्मक आली. मात्र श्वसनासंदर्भातील समस्या सोडल्यास इतर कोणतीही लक्षण त्याच्यामध्ये दिसत नव्हती.
6 आठवड्यांमध्ये मृत्यू
‘न्यू यॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या हवाल्याने, “रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर 3 आठवड्यांनी या व्यक्तीची वाचा गेली. त्यानंतर त्याला जेवण गिळण्यासही अडचण निर्माण झाली. त्यानंतर पीईजी (परक्यूटेनियस एंडोस्कोपिक गॅस्ट्रोस्टॉमी) ट्यूब लावण्याची गरज पडली,” असं सांगण्यात आलं. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर 6 आठवड्यांनी रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं. प्रियन डिसीज हा एक दुर्मिळ, अत्यंत घातक असा मेंदू संदर्भातील विकार आहे. हा आजार मानवाबूरोबरच प्राण्यांनाही होतो. मेंदूमधील प्रोटीनसंदर्भातील समस्या निर्माण झाल्याने ही समस्या होते.