युद्ध पेटलेलं असतानाच इस्त्रालयच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, म्हणाले ‘कठोर निषेध…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जगावर सध्या आणखी एक युद्ध संकट म्हणून घोंघावत आहे. पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दशवतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून याचा फटका दोन्ही देशातील नागरिकांना भोगावा लागत आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. हमास या संघटनेचा तळ असणाऱ्या गाझा पट्टीला संपूर्ण वेढा देण्यासह तेथील वीज, अन्न, इंधन पुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रालयच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. या युद्घात आतापर्यंत दोन्ही देशातील 1500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत या संभाषणाची माहिती दिली आहे. 

नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मला फोन करुन देशातील सध्याच्या स्थितीची माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. भारतातील लोक या कठीण काळात इस्त्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा कठोरपणे निषेध करतो”. 

हमासच्या हल्ल्यांवर काय बोलले होते नरेंद्र मोदी?

शनिवारी हमासने इस्त्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलसह एकजूट व्यक्त केली होती. तसंच हे दहशतवादी हल्ले आहेत सांगत याचा निषेध केला होता.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “इस्त्रायलमध्ये दहशतवादी हल्ले झाल्याच्या वृत्ताने जबर धक्का बसला आहे. आमच्या संवेदना आणि प्रार्थना निर्दोष पीडित आणि त्यांच्या कुटुंबासह आहेत. या कठीण काळात आम्ही एकजुटीने इस्त्रायलसह उभे आहोत”.

“भारत एक प्रभावशाली देश”

भारतातील इस्त्रायली राजदूत नाओर गिलोन यांनी म्हटलं होतं की, त्यांच्या देशाला भारताच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. भारत एक प्रभावशाली देश आहे. त्यांना दहशतवादाच्या आव्हानाची कल्पना आहे. या संकटाला ते चांगलेच ओळखतात. याक्षणी हमासचा अत्याचार रोखण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याची परवानगी आम्हाला दिली जाण्याची गरज आहे. 

“आम्हाला भारताकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. जगभरातील सर्व देश शेकडो इस्त्रायली नागरिक, महिला, पुरुष, वयस्कर आणि मुलांची विनाकारण होणारी हत्या आणि अपहरण यांचा निषेध करतील अशी आशा आहे. हे स्विकारलं जाऊ शकत नाही,” असं ते म्हणाले होते. 

Related posts