Karnataka Crime One arrested in the murder of a woman geologist in Bangalore

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : कर्नाटकची (Karnataka Crime) राजधानी बंगळुरुमध्ये (Bengaluru) वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या प्रकारात आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे.  43 वर्षीय एस. प्रतिमा यांची राहत्या घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Bengaluru Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला होता. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कर्नाटक सरकारची एक वरिष्ठ अधिकारी बंगळुरू येथे तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याची हत्या झाल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या एस. प्रतिमा यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता मृत अधिकाऱ्याच्या विभागात तैनात असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या महिला अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्याला बडतर्फ केल्याचे सांगितले जात आहे.

मृत अधिकारी केएस प्रतिमा या कर्नाटकच्या खाण आणि भूविज्ञान विभागात उपसंचालक म्हणून तैनात होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी प्रतिमा यांच्या घरात घुसून प्रतिमा यांच्यावर चाकूने हल्ला केला. गळा दाबून व गळा चिरल्याने प्रतिमा यांचा मृत्यू झाला. हल्ल्यावेळी त्या घरी एकट्याच होत्या. तर त्यांचा पती त्यांच्या गावी गेला होता. 

दुसरीकडे प्रतिमा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कंत्राटी कर्मचारी किरण याला अटक केली आहे. किरण 5 वर्षांपासून खाण विभागात तैनात होता. प्रतिमा यांनी काही दिवसांपूर्वी किरणला नोकरीवरून काढून टाकले होते. त्यामुळे त्याने सूड घेण्याचे ठरवलं होतं. खून करून किरण चामराजनगर येथे पळून गेला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने प्रतिमा यांना नोकरीवरून काढून टाकल्यामुळे खून केल्याचे उघड झाले आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, शिवमोग्गा येथून एमएस्सी पदवी घेतलेली प्रतिमा गेल्या दीड वर्षांपासून बंगळुरूमध्ये काम करत होत्या. बंगळुरूमध्ये राहण्यापूर्वी त्यांची नियुक्ती रामनगरात होती. प्रतिमा यांना गेल्या महिन्यात बेकायदेशीर खाणकामांवर छापे टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हत्येची माहिती देण्यात आली होती आणि त्यांनी या प्रकरणाची अधिक माहितीसाठी चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. 

दरम्यान, सरकारी अधिकाऱ्या हत्येवरुन भाजपाने कॉंग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी सरकारवर टीका केली आहे. “बंगळुरूमध्ये खाण माफियाच्या संशयितांकडून एका अधिकाऱ्याची निर्घृण हत्या संपूर्ण राज्यासाठी धक्कादायक आहे. काँग्रेसच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि या माफिया घटकांच्या वाढत्या धाडसाचे हे स्पष्ट द्योतक आहे. आपल्या राज्यात या घटना घडताना पाहून खूप वाईट वाटते,” असे तेजस्वी सूर्या यांनी म्हटलं.

Related posts