( प्रगत भारत । pragatbharat.com)
China mysterious pneumonia: नुकतंच भारतीयांना एक धडकी भरवणारी बातमी समोर आली होती. चीनमध्ये श्वाससंबंधी असलेल्या आजाराने भारतात एन्ट्री घेतली असल्याचं बोललं जातं होतं. यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात 7 रूग्णांना यासंबंधी लक्षणं दिसून आल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र यासंबंधी आता केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली आहे. मात्र या प्रकरणांचा सध्या चीनमध्ये लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या श्वसनासंबंधी आजाराशी काहीही संबंध नाहीये.
दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर यामध्ये 7 प्रकरणे आढळून आली आणि ‘चिंतेचे कारण नाही’ असं दिसून आलं आहे.
चीनमध्ये असलेल्या गंभीर आजारांशी याचा संबंध नाही
मंत्रायलाने जारी केलेल्या अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की, एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दिल्लीच्या एम्समध्ये बॅक्टेरियाची सात प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या प्रकरणांचा चीनमध्ये नुकत्याच झालेल्या न्यूमोनियाच्या घटनांशी संबंध आहे. ही बातमी वस्तुस्थितीवर आधारित नाही आणि दिशाभूल करणारी माहिती देते. दिल्ली एम्समध्ये आढळलेल्या बॅक्टेरियाच्या 7 प्रकरणांचा चीनमधील बालकांना दिसून येणाऱ्या श्वसनाच्या आजाराशी संबंध नाहीये.
या वर्षी आतापर्यंत, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या विविध श्वसन रोगजनक निगराणीखाली AIIMS दिल्लीच्या मायक्रोबायोलॉजी विभागात चाचणी केलेल्या 611 नमुन्यांपैकी एकाही नमुन्यात मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आढळून आलेला नाही.
केंद्र सरकारने असंही म्हटलं आहे की, भारताच्या कोणत्याही भागातून अशी कोणतीही लक्षणं नोंदवण्यात आलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.