( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी मोठ्याप्रमाणात सुरु आहे. एकीकडे ही तयारी सुरु असताना दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी राम मंदिरासंदर्भात एक विचित्र विधान केलं आहे.
निवडणूक संपल्यावर विचारत नाहीत
प्राणप्रतिष्ठापणेसंदर्भात बोलताना बिहारमधील मंत्री असलेल्या तेज प्रताप यादव यांनी, 22 जानेवारी रोजी रामजी अयोध्येत येणार नाहीत. रामजी माझ्या स्वप्नात आले होते. ते मला म्हणाले की, ‘हे सर्व काही ढोंग आहे. मी त्या दिवशी इथं येणार नाही.’ तेजप्रताप यांनी पुढे बोलताना, जेव्हा निवडणूक येते तेव्हा मंदिराचा मुद्दा पुढे केला जातो. निवडणूक संपल्यानंतर मंदिराला कोणी विचारतही नसल्याचा टोला लगावला. तेजप्रताप यांनी आपल्या डीएसएस या संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामधील भाषणात हे विधान केलं.
स्वप्नात कृष्ण आला
बिहार सरकारमधील मंत्री असलेल्या तेजप्रताप यांनी आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. कधी ते कृष्णाच्या रुपात दिसतात तर कधी सायकलवरुन मंत्रालयामध्ये पोहोचतात. तेजप्रताप यांनी त्यांना पडलेल्या स्वप्नांबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे असंही नाही. ते अनेकदा त्यांना पडलेल्या स्वप्नांबद्दल आपल्या जाहीर भाषणांमध्ये सांगत असतात. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये तेजप्रताप यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते झोपलेले दिसत होते. यावेळेस आपल्याला स्वप्नात महाभारताच्या युद्धादरम्यान दिसलेला श्रीकृष्णाचा रौद्रावताराचं दर्शन होत होतं असं त्यांचं म्हणणं होतं. श्रीकृष्णाचं हे रुप पाहून आपण डचकून जागे झालो, असा दावाही त्यांनी केलेला.
सायकलवर मंत्रालयात
यापूर्वी तेजप्रताप सायकलवर त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सकाळी 9 वाजता झोपले होते. त्याचवेळी नेताजी मुलायम सिंह त्यांना स्वप्नात दिसले. मुलायम सिंह यांनी आपल्याशी गप्पा मारल्या. मला मिठी मारली. तसेच मुलायम सिंह यांनी माझ्याबरोबर सायकलही चालवली. त्यामुळेच मी सायकलवरुन कार्यालयात आलो, असा दावा त्यांनी केलेला.
जोरदार तयारी
दरम्यान, अयोध्येमध्ये अगदी विमानतळापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत अनेक सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: अनेकदा अयोध्येमध्ये जाऊन आले आहेत. 22 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच हजारो अती महत्त्वाच्या व्यक्ती अयोध्येत येणार आहेत. त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.