आईच्या मोबाइलवरुन गेम खेळताना 13 वर्षीय मुलीची एक चूक अन् खात्यात उरले फक्त 5 रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mobile Game Addiction: गेमिंग हे व्यसन (Gaming addiction) असून, कधी गोष्टी आपल्या हातातून बाहेर निघून जातात हे कळत नाही. त्यातही जर तुमचं मूल अल्पवयीन असेल आणि गेमच्या आहारी गेलं असेल तर ते फक्त त्यांच्यासाठीच नाही तर पालकांसाठीही धोक्याची घंटा असते. गेमच्या आहारी गेलेल्या मुलांना आपण काय करत आहोत आणि कोणत्या स्तरावर जात आहोत याची कल्पना नसते. यामुळे पालकांनीच त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते. अन्यथा काय होऊ शकतं याचं उदाहरण दाखवणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलीने कुटुंबाने कष्टाने जमा केलेला पैसे अवघ्या काही क्षणात खर्च करुन टाकला. 

चीनमध्ये 13 वर्षीय मुलीने आपल्या कुटुंबाने कष्टाने जमा केलेला पैसा फक्त चार महिन्यात खर्च करुन टाकला आहे. ऑनलाइन गेमिंगसाठी तिने खर्च केलेली रक्कम वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. कारण तिने 1, 2 लाख नाही तर तब्बल 52 लाख 19 हजार 809 रुपये खर्च केले आहेत.  बर्‍याच गेममध्ये पेड टूल्स असतात जे गेमर्सना अधिक पैसे खर्च करण्यास आकर्षित करतात. हे टूल्स खरेदी केल्यास गेमर्सना अधिक चांगल्या प्रकारे गेम खेळता येतो. 

South China Morning ने दिलेल्या वृत्तानुसार,  मुलगी सतत मोबाइलचा (Mobile) वापर करत असल्याने तिच्या शिक्षकाला संशय आला आणि हे प्रकरण उघडकीस आलं. मुलगी शाळेत सतत मोबाइलचा वापर करताना दिसत होती. यानंतर शिक्षकाला मुलगी ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्याचा संशय आला. यानंतर शिक्षकाने मुलीच्या आईला याची माहिती दिली. माहिती मिळवण्यासाठी मुलीच्या आईने बँक खातं तपासलं असता तिला धक्काच बसला. 

Wang असं या मुलीच्या आईचं नाव आहे. त्यांनी बँक खातं तपासलं असता त्यात फक्त 5 रुपये होते. यानंतर मुलीच्या आईवर डोंगर कोसळला होता. व्हायरल व्हिडीओत त्या बँकेचं स्टेटमेंट दाखवताना रडत असल्याचं दिसत आहे. मुलीच्या वडिलांनी तिला जाब विचारला असता तिने गेम खरेदी करण्यासाठी 13 लाख 93 हजार 828 आणि गेम टूल्स खरेदी करण्यासाठी 24 लाख 39 हजार 340 रुपये खर्च केल्याची कबुली दिली. यानंतर आपल्या इतर 10 वर्गमित्रांसाठी गेम खरेदी करण्यासाठी तिने 11 लाख 61 हजार 590 इतके खर्च केले. 

इच्छा नसतानाही आणि भिती वाटत असूनही आपण वर्गमित्रांच्या गेमसाठी पैसे दिल्याचं तिने सांगितलं आहे. तसंच आपल्याला पैसे आणि ते कुठून आले याबद्दल अधिक माहिती नव्हती असं सांगितलं आहे. घरात डेबिट कार्ड सापडलं असता तिने मोबाइलशी कनेक्ट करुन पाहिलं. विशेष म्हणजे तिच्या आईनेच पैशांची गरज लागली तर असावा म्हणून तिला कार्डचा पासवर्डही दिला होता. कुटुंबाला आपण पैसे खरेदी केल्याचं कळू नये यासाठी तिने मोबाइल गेम व्यवहाराची सर्व माहिती मोबाइलवरुन डिलीट केली होती. 

हे वृत्त चिनी सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यानंतर नेमकं यासाठी जबाबदार कोण अशी चर्चा रंगली आहे. काहींनी 13 वर्षीय मुलीला आपण काय केलं आहे याची जाणीव झाली पाहिजे असं म्हटलं आहे. तर काहींनी पालकांना जबाबदार धरलं आहे. 

मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या 2022 च्या विश्लेषणानुसार, स्मार्टफोन व्यसनाधीनांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे, त्यानंतर सौदी अरेबिया आणि मलेशिया आहेत. 

Related posts