cyber crime voice clone fraud rise in india many case reported in delhi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या (NCRB) अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये 65893 सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) नोंद झाली होती. तर वर्ष 2021 मध्ये  52974 प्रकरणं नोंदवली गेली होती. धक्कादायक म्हणजे तंत्रज्ञान जसं अद्ययावत होतंय, तसं फसणूकीच्या पद्धतीतही बदल होतायत. सायबर गुन्हेगार अधिक स्मार्ट बनत चालले आहेत. यात आता आणखी एका तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. पण ही आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत मानली जातेय. बहुसंख्य लोक या फसवणुकीच्या या पद्धतीपासून बेसावध आहेत. 

सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीसाठी व्हॉईस क्लोनिंगची (Voice Cloning) पद्धत शोधून काढली आहे. आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा किंवा नातेवाईकाचा तंत्रज्ञानाच्या (Technology) मदतीने हुबेहुब आवाज काढत फसवलं जात आहे. फोन करुन अडचणीत सापडल्याचं कारण देत पैशाची मागणी केली जात आहे. आपला परिचीत आवाज असल्याने अनेक लोकं याला फसतात आणि पैसे ट्रान्सफर करतात. दिल्लीत व्हॉईस क्लोनिंगद्वारे फसवणूकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतल्या पीतमपुरा भागात राहाणारे राजेश कुमार हे एमसीडी इंजीनिअर आहेत. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी हैदराबादमद्ये एमबीए करतो. 

9 जानेवारीला राजेश कुमार यांना एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण हैदराबाद पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं. तुमचा मुलगा बलात्कार प्रकरणात पकडला गेला असल्याचं त्याने राजेश कुमार यांना सांगितलं. हे ऐकून राजेश कुमार यांच्या पायाखालची जमीन सरकली. समोरच्या तुम्ही चांगल्या घरातले वाटताय, त्यामुळे तुमच्या मुलाला सोडवायचं असेल तर पैसे द्यावे लागतील असं सांगितलं. धक्कादायक म्हणजे फोन करणाऱ्याने राजेश कुमार यांना त्यांच्या मुलाचा आवाजही ऐकवला. त्यांचा मुलगा आपली सुटका करण्याची मागणी करत होता. मुलाचा आवाज ऐकून राजेश कुमार यांना हा सर्व प्रकार खरा वाटला. 

फोन करणाऱ्या व्यक्तीने मुलाच्या सुटकेसाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. राजेश कुमार यांनी समोरच्या व्यक्तीला विनंती करत 20 हजार रुपये देण्याचं मान्य केलं. त्यांनी सांगितलेल्या अकाऊंटला पैसेही ट्रान्सफर केले. त्यानंतर राजेश कुमार यांनी आपल्या मुलाला फोन करुन तू सुखरुप आहेस हे विचारलं. यावर आपण सुखरुप असून कॉलेजमध्ये अभ्यास करत असल्याचं सांगितलं. यामुळे राजेश कुमार यांना आपली फसवणूक झाल्याचं कळलं. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

नोएडातही अशीच घटना
नोएडातही अशीच घटना समोर आली आहे. हिमांशु शेखर सिंह नावाच्या व्यक्तीला एक फोन आला. तुमचा मुलगा सामुहिक बलात्कार प्रकरणात पकडला गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांना मुलाचा आवाजही ऐकवला.आवाज आणि बोलण्याची पद्धत ऐकून हिमांश सिंह यांना आपला मुलगाच असल्याचं वाटलं. मुलाला सोडवण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आणि यासाठी पेटीएम नंबर दिला. हिमांशु सिंह यांनी दिलेल्या नंबरवर 30 हजार रुपये पेटीएम केले. 

दरम्यान पोलिसांनी अशा कोणतेही कॉल आले की आधी खात्री करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. 

Related posts