( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मिर्झापूर (Mirzapur) येथे ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याने कार चालक आणि प्रवाशात मोठा वाद झाला. यानंतर तर कार चालकाने प्रवाशाच्या अंगावर टॅक्सी घालत त्याला ठार केलं. सीसीटीव्ही आणि घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांच्या आधारे कारचालकाला अटक कऱण्यात आली आहे.
राजेशधर दुबे (50) असे पीडित व्यक्तीचं नाव आहे. राजेशधर आपल्या भाच्याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले असता सोमवारी संध्याकाळी मिर्झापूरमधील विंध्याचल पोलीस स्टेशन अंतर्गत कोलाही गावात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेशधर दुबे यांच्या भाच्याचं रविवारी मिर्झापूरमध्ये लग्न झालं. सोमवारी सकाळी लग्नानंतर सर्व विधी उरकले होते. यानंतर राजेशधर दुबे आपले इतर मित्र लालजी मिश्रा, धीरेंद्र कुमार दुबे आणि इतरांसह परतीच्या प्रवासाला निघाले होते. पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी बोलेरो गाडी बूक करण्यात आली होती.
सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासात असताना दुबे आणि कार चालकात राजकीय विषयावरुन वाद सुरु झाला. राजेशधर दुबे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली असता वाद आणखी वाढला. तसंच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वाईट बोलण्यास सुरुवात केली असता त्यांनी गाडीच थांबवली.
दुबे यांचे राजकीय विचार ऐकल्यानंतर चालकाने गाडी थांबवली आणि त्यांना खाली उतरण्यास भाग पाडलं. यानंतर दुबे गाडीचा रस्ता अडवण्यासाठी समोर जाऊन उभे राहिले. पण यानंतर आणखी काहीतरी धक्कादायक होणार होतं.
दुबे यांच्याशी झालेला वाद इतका वाढला होता की, चालकाने थेट त्यांच्या अंगावरच गाडी घातली. तब्बल 200 मीटपर्यंत चालकाने त्यांना फरफटत नेलं. सहप्रवाशांनी यानंतर आरडाओरड सुरु केली असता चालकाने गाडी थांबवली आणि घटनास्थळावरुन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी चालकाचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसंच गाडीतील इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली होती. अखेर सहा तासांनी या चालकाचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलं. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. अमजद अशी या चालकाची ओळख पटली आहे.