Delhi Robbery: डिलिव्हरी बॉय, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक; दरोड्याचा छडा लावताना आरोपींना पाहून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Robbery: राजधानी दिल्लीमधील (Delhi) प्रगती मैदान (Pragati Maidan) परिसरात 24 जून रोजी दिवसाढवळ्या झालेल्या चोरीनंतर पोलीस आणि क्राइम ब्रांचने (Crime Branch) एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. या चोरीत सहभागी झालेल्या आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण हे सराईत गुन्हेगार नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. आरोपींमध्ये डिलिव्हरी बॉय,  नाभिक, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक यांचा सहभाग आहे. या सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी रेकी केली होती. यानंतर 24 जूनला त्यांनी चोरी कऱण्याचा कट आखत तो फत्ते केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर 26 जूनला समोर आली होती. 

सात जणांना अटक

सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं होतं. एकीकडे उच्चभ्रू वस्तीत दिवसाढवळ्या अशाप्रकारे बंदुकाचा धाक दाखवत चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर दुसरीकडे व्यापारीही घाबरले होते. नायब राज्यपालांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि नंतर पोलिसांनी वेगाने कारवाईची चक्रं फिरवली. 48 तासांपासून अधिक काळ करण्यात आलेल्या छापेमारीनंतर 7 जणांना अटक करण्यात आली. यामधील 2 संशयित आरोपींना 26 जूनच्या रात्रीच अटक करण्यात आलं होतं. तर इतक 5 आरोपींच्या अटकेची माहिती 27 जूनला देण्यात आली. 

हरियाणा आणि उत्तर प्रदेशात छापेमारी

दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, 24 जूनच्या आदल्या रात्री 4 जणांनी प्रगती मैदान बोगद्यात दरोडा टाकण्याचा कट आखला. याप्रकरणी क्राइम ब्रांच आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी सुरु केली होती. आरोपींना पकडण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेशात छापेमारी करण्यात आली आणि 7 जणांना अटक केलं. 

महत्त्वाचं म्हणजे या दरोड्यात सहभागी झालेले सर्वजण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नोकरी करणारे आहेत. 25 वर्षीय उस्मान हा एका ऑनलाइन शॉपिंग मर्चेंटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो चांदनी चौकात जास्त काम करत असून, त्याला येथे होणाऱ्या व्यवहारांची माहिती होती. कर्जात बुडाला असल्याने त्यानेच या दरोड्याचा कट आखला होता. 

उस्मानचा चुलत भाऊ इरफानही यात सहभागी होती. इरफान नाभिक आहे. त्यानेच या दरोड्यासाठी बाईकची व्यवस्था केली. तसंच बाईक चालवणाऱ्या एका आरोपीचं नाव अनुज मिश्रा उर्फ शँकी आहे. तो 26 वर्षांचा असून दिल्ली जल बोर्ड गोदामातील मेकॅनिक आहे. 

आरोपी कुलदीप याने दरोडा टाकण्यासाठी इतर व्यवस्था केली होती. तसंच कामगिरी फत्ते झाल्यानंतर पुरावे नष्ट केले होते. पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. 

जेव्हा दरोड्याची योजना आखली जात होती, तेव्हा भाजी विक्रेता सुमितही उस्मानसह असायचा. कोणालाही संशय येऊ नये यासाठी इरफानने सुमितला सोबत घेतलं होतं. 

पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा त्यांनी चांदनी चौकात कोणीही संशयित सापडला नाही. नंतर त्यांना एक माहिती मिळाली आणि संशय असणाऱ्या एका व्यक्तीला ट्रॅक केलं. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बोगद्याच्या आत दरोडा टाकला, कारण त्यांना जर रस्त्यावर लक्ष्य केले तर कार थांबणार नाही अशी भीती होती. आरोपींकडून दोन दुचाकी, एक पिस्तूल, काही काडतुसे आणि 5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पण आता हेच 5 लाख रुपये गुंता वाढवत आहेत. कारण तक्रार 2 लाखांची लूट झाल्याची होती. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करणार आहे. 

Related posts