स्वतःच्याच पत्नीचं पतीने चारवेळा लावलं लग्न; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : लग्न (marriage) होत नसल्याने अनेक तरुणांची लग्नाच्या बहाण्याने फसवणूक (Fraud) केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लग्न होत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी लग्न करुन काही टोळ्या फसवणूक करुन लुटमार करत पळून जायच्या. या टोळ्या एकाच महिलेचे अनेक तरुणांसोबत लग्न लावून फसवणूक करायचे. देशभरात फसवणुकीच्या अनेक घटना याआधीही समोर आल्या होत्या. मात्र राजस्थानमध्ये (Rajasthan Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमध्ये एका पतीनेच त्याच्या पत्नीचे चारवेळा लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान पोलिसांनी अशाच प्रकारे लुटमार करणाऱ्या एका वधूला अटक केली आहे जिचे लग्न तिच्याच पतीने पैशाच्या लालसेपोटी लावले होते. 

राजस्थानच्या अलवरमधील बन्सूरमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने त्याच्या पत्नीचे तब्बल चारवेळा लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर नववधू तिच्या खऱ्या नवऱ्याला त्यांचे लोकेशन पाठवायची आणि नंतर पैसे आणि दागिने घेऊन फरार व्हायची. मात्र पोलिसांनी या जोडप्याला अखेर अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील एक व्यक्ती आपल्या पत्नीला ती अविवाहित असल्याचे सांगायचा आणि तिचे लग्न लावून द्यायचा. त्यानंतर संधी पाहून 15 दिवसांनी तिला घेऊन  पळून जायचा. त्यानंर दोघेही पुन्हा नवीन गिऱ्हाईक शोधायचे आणि त्याची फसवणूक करायचे.

आरोपींनी अशाच प्रकारने तीन जणांची फसवणूक केली होती. मात्र चौथ्या व्यक्तीची फसवणूक करताना दोघेही पकडले गेले. अलवरमधील बन्सूरच्या मीना मोहल्लामध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय हरिमोहन मीना यांचे आसामच्या दीप्ती नाथशी 3 जून रोजी लग्न झाले होते. मुलीच्या पालकांनी सांगितले तसे लग्नाचे विधी पार पाडण्यात आले असे हरिमोहन यांनी सांगितले. लग्नासाठी तब्बल आठ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यातील चार लाख रुपये हे आसाममध्ये राहणार्‍या लोयाकलिताच्या नावावर करण्यात आले होते. 

कसे पकडले आरोपी?

लग्नानंतर 15 दिवसांतच दीप्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. मला अनेकवेळा शंका देखील आली होती. 21 जून रोजी दुपारी माझ्या घराबाहेर एक कार आली आणि चालकाने हॉर्न वाजवला. हॉर्न ऐकताच दीप्ती पळत जाऊन गाडीत बसली. तेवढ्यात माझा मोठा भाऊ हेमराम आतून बाहेर आला. दीप्ती पळून जाणार असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सगळ्या घरच्यांना ओरडून बोलवून घेतलं. सगळे कुटुंबिय एकत्र येताच त्यांनी गाडी अडवून धरली. कुटुंबियांनी दोघांनाही पकडून ठेवलं, असे हरिमोहन मीनाने सांगितले.

त्यानंतर मीना कुटुंबियांनी दिप्ती आणि लोयाकलिता दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले. तिथे पोलिसांच्या चौकशीत दीप्ती घरातून पैसे आणि दागिने घेऊन पळून जाणार होती अशी माहिती उघड झाली. लोयाकलिता याने यासाठी कोटपलती येथून गाडी आणली होती आणि तिथूनच ते पळ काढणार होते. पोलिसांनी दिप्तीची आणखी सखोल चौकशी केली असता तिने सांगितले की ती विवाहित असून तिला दोन मुले देखील आहेत. तसेच लोयाकलिता आपला पती असल्याचेही दिप्तीने सांगितले. तर दुसरीकडे लोयाकलिता याने हरिमोहन मीना आणि त्याच्या कुटुंबियांनीच माझ्या पत्नीला फसवून इथे आणले असा आरोप केला. हा सर्व प्रकार ऐकून मीना कुटुंबियांच्या तर पायाखालची जमिनच सरकली.

मात्र पोलिसांनी सक्ती दाखवताच लोयाकलिता कबुल केले दिप्ती त्याची दुसरी पत्नी आहे. दोघांचीही टोळी असल्याचं लोयाकलिता याने पोलिसांनी सांगितलं. आतापर्यंतच्या तपासात लोयकलिताने आपल्या पत्नीचे ४ वेळा लग्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या दोघांची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Related posts