परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं, विद्यार्थ्यांने आठव्या माळ्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरुत 19 वर्षाच्या विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या इमारतीवरुनच उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. BTech (computer science) चं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं होतं. तो कॉपी करण्याचा प्रयत्न करत होता असं दिसत होतं. दरम्यान यानंतर शिक्षकांनी पालकांना बोलावल्याने घाबरलेल्या विद्यार्थ्याने आठव्या माळ्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. 

आदित्य प्रभू असं या विद्यार्थ्याचं नाव असून, तो मंगळुरुचा आहे. कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आदित्य प्रभू याला परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं होतं. तो पहिल्या सेमिस्टरचा विद्यार्थी होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सकाळी 11.30 वाजता आदित्य प्रभू मोबाईलचा वापर करत असल्याचं पर्यवेक्षकांना दिसलं. यानंतर पर्यवेक्षकांनी मोबाईल जप्त केला आणि आदित्य प्रभूला दुसऱ्या रुममध्ये नेलं. तिथे इतर शिक्षकांनी त्याला सुनावलं आणि समजूत काढली. यानंतर त्यांनी तुझ्या पालकांना याची माहिती दिली जाईल असं सांगितलं. शिक्षक पालकांना बोलावणार आहेत हे ऐकताच आदित्य प्रभू खोलीच्या बाहेर आला आणि इमारतीच्या वर गेला. तेथून त्याने 12.30 ते 1 च्या दरम्यान उडी मारुन जीवन संपवलं”. आदित्य प्रभू हा एकुलता एक मुलगा होता. 

आदित्यचे वडील गणेश प्रभू हे एका खासगी कंपनीत कर्मचारी आहेत. त्यांनी मुलाच्या आत्महत्येनंतर कॉलेज व्यवस्थापनावर आरोप केला आहे. मुलाच्या मृत्यूसाठी त्यांनी मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. 

“त्याला मोबाईलच्या सहाय्याने गैरप्रकार करताना पकडण्यात आलं होतं. पर्यवेक्षकांनी त्याला पकडलं आणि नंतर पालकांना बोलावण्यात आलं. त्याचे पालक येणार होते, त्याच्यााधीच टोकाचं पाऊल उचललं. परीक्षेत गैरप्रकार केल्याने त्याने आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत आहेत. आम्ही सध्या जे पोलीस सांगत आहेत, त्यावर विश्वास ठेवत आहोत,” असं पीपल्स एज्युकेशन सोसायटी युनिव्हर्सिटीच्या (People’s Education Society University) प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. 

Related posts