( प्रगत भारत । pragatbharat.com)
Seema Haider Case: पबजी खेळताना नोएडात राहणाऱ्या सचिनच्या प्रेमात पडली. त्याच्याशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आली. एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना सध्या चर्चेत आली आहे. सीमा हैदर (Seema Haider) ही महिला पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आली आहे. मात्र, ही प्रेमकहाणी नसून पाकिस्तानचा कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सीमा हैदरची चर्चा असतानाच आणखी एक धक्कादायक घटना भारतात घडली आहे. भारताच्या शेजारील देश बांग्लादेशातून जूली नावाची मुलगी लग्न कऱण्यासाठी भारतात आली. लग्न लागताच पतीला बांग्लादेशात घेऊन गेली आहे. मात्र तिथे त्याच्यासोबत भयंकर प्रकार सुरू असल्याची तक्रार मुलाच्या आईने दिली आहे.
बांग्लादेशात राहणारी जूलीचे मुरादाबाद येथे राहणाऱ्या अजयसोबत फेसबुकवरुन मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यानंतर ती लग्न करण्यासाठी बांग्लादेशवरुन भारतात आली. इथे येऊन तिने हिंदू धर्म स्वीकारत रिती-रिवाजानुसार अजयसोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतरच बहाणा बनवून अजयला बांग्लादेशला घेऊन गेली. मात्र, काहीच महिन्याने त्याचा रक्ताने चेहरा माखलेला फोटो त्याच्या कुटुंबियांना मिळाला. या घटनेने सध्या मोठी खळबळ उडाली आहे. अजयच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महिलेने पोलिसांना एक पत्र पाठवले आहे. यात तिने मुलाला बांग्लादेशातून परत आणण्याची विनंती केली आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून तिचा मुलगा अजय बांग्लादेशात राहणाऱ्या जुलीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत होता. त्यानंतर जूली 3 महिन्यांनी तिच्या 11 वर्षांच्या मुलीसह मुरादाबाद येथे आली. तिथे त्याच्या परिवारासोबत काही दिवस राहून तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. इतकंच नव्हे तर, हिंदू धर्मानुसार तिने अजयसोबत लग्नदेखील केले.
जुलीच्या व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी ती पुन्हा बांग्लादेशला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिच्यासोबत अजयदेखील होता. काही दिवसांनी अजयने फोन करुन तो चुकीने बॉर्डर क्रोसकरुन बांग्लादेशात पोहोचला असल्याचे आईला सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अजयचा फोन आला की तो बांग्लादेशात असून 10 ते 15 दिवसांत परत येईल.
काही दिवसांतच पुन्हा अजयचा फोन आला आणि त्याने त्याच्या आईकडे पैशांची मागणी केली आणि फोन कट झाला. त्यानंतर त्याच्या आईच्या व्हॉट्सअॅपवर मुलाचा फोटो आला. त्यात त्याचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. मुलाचा फोटो पाहून त्याची आई घाबरली आणि तिने तडक पोलिस स्टेशन गाठले. माझ्या मुलाला पुन्हा भारतात घेऊन यावे, अशी विनंती तिने केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.