( प्रगत भारत । pragatbharat.com)
चांद्रयान-3 (Chandrayan 3) सध्या चंद्राच्या कक्षेत दाखल झालं असून, इस्रोने (ISRO) काही फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, चांद्रयान-3 च्या निमित्ताने भारत अनेक न उलगडलेली कोडी उलगडेल अशी जगाला अपेक्षा आहे. चंद्रावरील पाणी, जीवन, माती अशा अनेक गोष्टी लोकांसाठी कुतुहूलाचा विषय आहे. पण चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणे कार चालवण्याचा अनुभव कसा असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना…पण तुम्हाला माहिती आहे का की चंद्रावर असा प्रयोग करण्यात आला आहे. त्याबद्दल जाणून घ्या….
डेविड रैंडोल्फ स्कॉट’ (David Randolph Scott) यांनी चंद्रावर कार चालवण्याचा हा पराक्रम केला आहे. पृथ्वीपासून 3.84 लाख दूर असणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर त्यांनी कार पळवली होती. डेविड यांनी आपल्या आयुष्यातील 546 तास 54 मिनिटं अंतराळात घालवली आहेत. 1971 मध्ये अपोलो-15 मोहिमेदरम्यान चंद्रावर गाडी चालवणारे ते पहिले व्यक्ती ठरले होते. ही कोणतीही साधी गाडी नव्हती. तर मून रोव्हर व्हेईकल होतं, ज्याला चंद्रावर केल्या जाणाऱ्या संशोधनात मदत करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं.
कोण आहे रैंडोल्फ स्कॉट?
स्कॉट यांनी जेव्हा 31 जुलै 1971 रोजी चंद्रावर वाहन चालवलं होतं, तेव्हा अशी कामगिरी करणारे जगातील ते पहिले व्यक्ती होते. 6 जून 1932 रोजी स्कॉट यांचा जन्म झाला होता. स्कॉट हे अपोलो 15 मिशनच्या कमांडर स्वरुपात चंद्रावर उतरणारे सातवे व्यक्ती ठरले होते. हे चौथं मानवी लँडिंग होतं.
स्कॉट हे ग्रुप-3 अंतराळवीरांपैकी पहिले होते, म्हणजेच 1963 मध्ये NASA ने उड्डाण करण्यासाठी निवडलेल्या अंतराळवीरांचा तिसरा गट होता आणि त्याच्या मोहिमेचे नेतृत्व करणारे ते पहिले व्यक्ती होते. कमांडर नील आर्मस्ट्राँग सोबत, स्कॉट यांनी जेमिनी 8 (मार्च 16, 1966) च्या विमानाचं उड्डाण केलं होतं. त्यामुळे त्यांना चंद्र मोहिमेचा अनुभव होता.
अपोलो-15 मोहीम आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ड्रायव्हिंग
26 जुलै 1971 ला अपोलो-15 ला सकाळी 9 वाजून 34 मिनिटांनी फ्लोरिडाच्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून लाँच करण्यात आलं होतं. रँडॉल्फ स्कॉट, लुनर मॉड्यूल पायलट जेम्स इर्विन आणि कमांड मॉड्यूल पायलट अल्फ्रेड वर्डेन यांचा या मोहिमेत सहभाग होता. सुमारे 4 दिवसांच्या प्रवासानंतर, स्कॉट आणि इर्विन हॅडली यांची ही टीम रिले नावाच्या खोऱ्याजवळील ऍपेनिन पर्वताच्या पायथ्याशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरली.
कसं होतं चंद्रावर धावलेलं वाहन
ल्युनर रोव्हिंग व्हेईकल (LRV), ज्याला “मून बग्गी” देखील म्हटले जाते. मे 1969 पासून विकसित केले जात होते. ज्याची जबाबदारी बोईंगकडे (Boeing) देण्यात आली आहे. बोईंग ही अमेरिकन कंपनी आहे जी जगभरात विमाने, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना, निर्मिती आणि विक्री करतं. LRV चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना त्याचे वजन 209 किलो आणि दोन अंतराळवीर आणि त्यांची उपकरणे घेऊन जाताना 700 किलो होते.
या रोव्हिंग व्हेईकलच्या प्रत्येक चाकात 200W क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला होता. या गाडीला ताशी 10 ते 12 किमीने चालवलं जाऊ शकत होतं. ही गाडी कोणताही अतंराळवीर चालवू शकत होता. पण याची जबाबदारी फक्त कमांडरकडे सोपवण्यात आली होती.
ही गाडी तयार करण्यासाठी 17 महिने लागले होते. ही गाडी तयार करताना चंद्रावर सहजपणे चालवली जाऊ शकते याची काळजी घेण्यात आली होती. अपोलो-15 च्या अंतराळवीरांनी तीन वेगवेगळ्या ट्रेकवर जवळपास 28 किमीचं अंतर कापलं आणि चंद्र मॉड्यूलच्या बाहेर 17 तासांपेक्षा जास्त वेळ घालवला. 7 ऑगस्टला ही टीम पुन्हा पृथ्वीवर परतली होती.