स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Independence Day 2023 Special Guests List: स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांची तयारी देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ‘विशेष पाहुण्यांची यादी’ तयार करण्यात आली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाची विशेष निमंत्रणे पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. विशेष आमंत्रण देण्यात आलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 1800 जणांचा समावेश आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांमधून या खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे ज्यांनी देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा हातभार लावला आहे. केंद्राच्या ‘जन भागिदारी’ मोहिमेअंतर्गत या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे.

यांचाही समावेश

‘व्हायब्रंट व्हिलेज’ मोहिमेमधील गावांचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मासेमारी करणाऱ्यांबरोबरच सेंट्रल विस्टा या नव्या संसदेची इमारत उभारणाऱ्या कामगिरांनाही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. तसेच खादी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या शाळांचे शिक्षक, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे कर्मचारी यांच्याबरोबर ‘अम्रीत सरोवर’ आणि ‘हर घर जल योजना’ प्रकल्पांमध्ये सहभागी झालेल्यांचाही या विशेष नियमंत्रितांमध्ये समावेश आहे.

‘व्हायब्रंट व्हिलेज’ योजना काय आहे?

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या गावांमधील रहाणीमाणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘व्हायब्रंट व्हिलेज’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावकऱ्यांनी गावातच रहावं अशी चालना यामार्फत दिली जात आहे. गावकऱ्यांनी गावं सोडून जाऊ नये आणि त्यामुळे देशाच्या सीमेजवळच्या भागांमध्ये सुरक्षेसंदर्भातील समस्या निर्माण होऊ नये असा या मोहिमेमागील हेतू आहे.

पुणेकर शेतकऱ्याचाही समावेश

विशेष आमंत्रितांमध्ये देशातील 50 परिचारिकांचाही समावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या 50 जणांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही आमंत्रीत करण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 2 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात पुणे जिल्ह्यातील अशोक सुदाम घुले या 54 वर्षीय शेतकऱ्याचाही समावेश आहे. “मी कधी विचारही केला नव्हता की मी दिल्लीतील लाल किल्ल्याला भेट देईल. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाला उपस्थित रहाणं हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे,” असं घुले यांनी म्हटलं आहे. घुले हे प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. घुले यांनी दीड एकरावर उसाची शेती आहे.

वर्षाला 6 हजार रुपयांची मदत

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्याचा या योजनेचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये पुरवली जाणार आहे. दर 4 महिन्यांना 2 हजार रुपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केला जातो. 

Related posts