( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News: डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी जन्मदात्या बापानेच मुलीचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने 52 वर्षांच्या पुरुषासोबत लग्न लावलं आहे. पीडित मुलीनेच एका व्हिडिओच्या माध्यमातून मदतीची मागणी केली आहे. या अल्पवयीन मुलीला पुढे शिक्षण घ्यायचे आहे तसंच, तिला या लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे.
व्हायरल व्हिडिओत तरुणीने म्हटलं आहे की, वडिलांच्या डोक्यावर कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठीच त्यांनी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले. वडिलांच्या डोक्यावर भरपूर कर्ज होते. कर्ज देणाऱ्या ५२ वर्षांच्या व्यक्तीने कर्जाच्या रकमेच्या बदल्यात मुलीचे लग्न लावून दे. त्यानंतर माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून टाकलं. माझा कोणताही विचार न करता त्यांनी हा निर्णय परस्पर घेतला. अल्पवयीन तरुणीने म्हटलं आहे की, मला हे लग्न करायचे नव्हते. माझ्या पतीचे वयदेखील जास्त आहे. ते रोज मला शिवीगाळ करतात हे सगळं माझ्या सहनशक्तीपलीकडचे आहे.
सदर तरुणी ही झारखंड येथील असून मागील महिन्यात तिचे लग्न लावून देण्यात आले होते. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिने या लग्नाला विरोध केला होता. मात्र तिचे काही एक ऐकण्यात आले नाही. लग्नानंतर ती सासरी बिहारच्या भागलपूर येथे राहण्यास आली. लग्नानंतर पती तिला रोज मारहाण करतो. तर, सतत शिवीगाळ करत असतो. तरुणीने पुढे म्हटलं आहे की, पती तिचा लैंगिक छळदेखील करतो.
पतीच्या रोजच्या त्रासाला वैतागून मुलगी गपचूप घरातून पळून बहिणीच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर मंगळवारी तिने पतीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले होते. मात्र पोलिसांनी तिची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. हे प्रकरण या राज्यातील नाही असं म्हणून तिला तिथून जायला सांगितलं. त्यानंतर ती डीआयजी ऑफिसमध्ये पोहोचली होती मात्र तिथेही तिची कोणी मदत केली नाही.
या सगळ्या प्रकाराला वैतागून पीडितेने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मुलीने तिच्यासोबत घडलेल्या सर्व घटना या व्हिडिओत मांडल्या होत्या. तसंच, मला न्याय मिळावा जर मला न्याय मिळाला नाही तर मी जीव देईन, असं तिने म्हटलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भागलपूरच्या एसपी आनंद यांनी चौकशीची आदेश दिले आहेत. दोषीविरोधात कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.