एक वर्षांचा पुतण्या सतत रडायचा, वैतागलेल्या काकाने त्याचा गळाच आवळला

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News In Marathi: माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुतण्याच्या रडण्याला वैतागलेल्या काकाने त्याचीच हत्या केली आहे. एक वर्षांचा पुतण्या सतत रडायचा याचाच राग काकाला होता. या रागातून त्याने पुतण्याला जीवे मारले आहे. तर, शेतात मृतदेह फेकून देण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे तर मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे मुलाच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. 

हरियाणातील सोनीपतमधील बडौता गावात हा प्रकार घडला आहे. ग्रामस्थांना शेतात एक वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मुलाची आई सपना हीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आई-वडीलांचे लहानपणीच निधन झाले होते. त्यानंतर ती तिच्या मामाकडे राहत होती. उत्तप प्रदेश इथे राहणाऱ्या राहुलसोबत तिचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर राहुल तिला सतत मारहाण करत होता. राहुल आणि सपनाला चार मुलं आहेत, असं तिने पोलिसांना सांगितले. 

सपनाने पुढे म्हटलं आहे की, सहा महिन्यांपूर्वी ती राहुलसह पंजाबमध्ये राहण्यास आली होती. राहुल मजुरी करुन घर चालवत होता. मात्र अचानक एक दिवस तो त्याच्या वहिनीसह राहायला लागला त्यांनी मुलांची आणि तिची जबाबदारीही झटकली. सपना आणि तिची मुलं रस्त्यावर आली व भीक मागून जीवन जगू लागली. जवळपास दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने तिला आसरा दिला व तिच्या मोठ्या मुलासोबत तिचे लग्न लावून दिले. 

महिलेचा मोठा मुलगा विक्कीसोबत तिने लग्न केले तेव्हाच  तिचा धाकटा दीर पवनसोबत तिचे अनैतिक संबंध होते. मात्र पवनला तिच्या धाकट्या मुलाचा राग यायचा. धाकटा मुलगा सतत रडायचा यामुळं तो त्याचा राग करायचा. अनेकदा त्याने तिला धमकीही दिली होती. 9 सप्टेंबर रोजी दुपारी मुलगा एका खोलीत झोपला होता मात्र, थोड्यावेळापूर्वी त्याला जाऊन बघितले तेव्हा मुलगा खोलीत नव्हता. त्यानंतर महिलेला पवनवर संशय आला तेव्हा तिने पोलिसांना याबाबत सूचना दिली. 

या प्रकरणी सब इन्स्पेक्टर नवीन कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पवनने त्याच्या एक वर्षांच्या पुतण्याची गळा दाबून हत्या केली. त्याला पुतण्याचे रडणे आवडत नव्हते म्हणून त्याने हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related posts