‘तू काय माझा बाप आहेस का?’, पत्रकाराच्या प्रश्नावर आमदार संतापला, म्हणाले ‘माझी बंदूक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बिहारमध्ये कायद्याचं राज्य आहे की आमदारांचं असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. याचं कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे आमदार गोपाल मंडल हातात पिस्तूल घेऊन रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे बंदुकीचं प्रदर्शन केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावरुन वाद पेटला असतानाच आता गोपाल मंडल यांनी यासंबंधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच शिवीगाळ केली आहे. 

पत्रकारांनी गोपाल मंडल यांना तुम्ही रुग्णालयात बंदूक घेऊन का गेलात? अशी विचारणा केली. त्यावर ते संतापले आणि थेट शिवागीळच केली. “हो आताही माझ्याकडे आहे, दाखवू का. मला विचारणारे तुम्ही कोण? मला वाटेल तेव्हा बंदुकीचं प्रदर्शन करणार. तुम्ही काय माझे बाप आहात, जे मला रोखणार? चला पळा,” असं गोपाल मंडल म्हणाले आहेत.

हाताता पिस्तूल घेऊन पोहोचले होते आमदार

काही दिवसांपूर्वी गोपालपूर विधानसक्षा क्षेत्रातील आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल मायागंज येथील जवाहरलाल नेहरु मेडिकल महाविद्यालयात पिस्तूल घेऊन पोहोचले होते. यावेळी त्यांचे सुरक्षारक्षकही सोबत होते. आमदारांच्या हातात पिस्तूल असल्याचं पाहून रुग्णालयातील लोक घाबरले होते. काही वेळाने ते आपल्या सुरक्षारक्षकांसह निघून गेले होते. 

हातात पिस्तूल घेऊन पोहोचल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोपाल मंडल यांनी कॅमेऱ्यावर याबद्दल बोलण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी राजकारणात आपले फार शत्रू असून, त्यामुळे शस्त्र ठेवल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. माझ्याकडे या पिस्तूलचा परवाना आहे. आधी गुंडांकडून भीती असायची, पण आता नेत्यांकडून भीती आहे. जेव्हापासून खासदार होण्याची तयारी सुरु केली आहे तेव्हापासून राजकीय शत्रू वाढले आहेत असंही ते म्हणाले होते. 

दरम्यान, या घटनेनंतर भाजपा नेते अजय आलोक यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा नवा बिहार आहे, जिथे आमदार पत्रकारांना शिव्या देतो. बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधऱी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. “आम्ही गोळी बंदूकवाले नाही. आम्ही गांधींच्या मार्गावर चालणारे आहोत. चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांचा मी निषेध करतो. त्यानी चुकीचं केलं आहे. जेडीयू अशी भाषा बोलत नाही,” असं ते म्हणाले आहेत. 

Related posts