हैदराबादचं नामकरण ‘भाग्यनगर’ करणार; भाजपाच्या घोषणेवर ओवेसी संतापले, म्हणाले ‘तुमच्या काय…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

तेलंगणात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच भाजपाने जर राज्यात आपली सत्ता आली तर आपण तेलंगणाचं नामांतरण ‘भाग्यनगर’ असं करु असं आश्वासन दिलं आहे. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपाला खडे बोल सुनावले असून टीका केली आहे.

“हे भाग्यनगर नाव कुठून आलं हे आधी त्यांना विचारा. हे कुठे लिहिलं आहे हे त्यांना विचारा. तुम्ही हैदराबादचा द्वेष करता आणि नामकरण करणं हे याच द्वेषाचं प्रतीक आहे. हैदराबाद ही आमची ओळख आहे. तुम्ही त्याचं नामांतरण कसं काय करु शकता? तुम्ही फक्त द्वेषाचं राजकारण करत आहात,” अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. पुढे म्हणाले की, “हैदराबादचं नामांतरण करण्याचं आश्वासन हे भाजपाच्या फुटीर राजकारणाचं चिन्ह आहे. मला आशा आहे की हैदराबाद आणि तेलंगणातील लोक त्यांना योग्य उत्तर देतील”.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात प्रचारसभेदरम्यान हैदरबादचं नामांतर भाग्यनगर केलं पाहिजे असं म्हटलं होतं. “काँग्रेसने या शहराला हैदराबाद बनवलं. आम्ही या शहराला भाग्यनगर बनवण्यासाठी आलो असून, त्याचं भाग्य बदलणार आहोत. श्री भाग्यलक्ष्मी मंदिर येथे आहे आणि हे शहर पुन्हा एकदा भाग्यनगर होईल,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री आणि तेलंगणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला समर्थन दिलं असून, आपला पक्ष सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलून ‘भाग्यनगर’ करु असं आश्वासन दिलं.  यावेळी रेड्डी यांनी मद्रास, बॉम्बे, कोलकातासारख्या शहरांची नावं बदलली असल्याचा दाखला दिला. 

“हो, नक्कीच जर भाजपा सरकार सत्तेत आलं तर आम्ही हैदराबादचं नाव बदलू. हा हैदर कोण आहे? असं मी विचारत आहे. आपल्याला या हैदर नावाची गरज आहे का? हैदर कुठून आला? कोणाला हैदरची गरज आहे? जर भाजपा सत्तेत आली तर नक्कीच आम्ही हैदरला हटवू आणि नाव बदलून भाग्यनगर करु,” असंही रेड्डी म्हणाले.

जर मद्रासचं चेन्नई, बॉम्बेचं मुंबई आणि कलकत्ताचं कोलकाता होऊ शकतं तर हैदराबादचं नामांतरण भाग्यनगर करण्यात चुकीचं काय आहे? अशी विचारणाही त्यांनी केली. गुलामाची मानसिकता दर्शवणाऱी सर्व नावं आम्ही सत्तेत आल्यास बदलणार असं ते म्हणाले. 

महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी शहरात केलेल्या भाषणात हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर केला होता. सरदार पटेल यांनी भारताला एकसंध करण्याच्या मोहिमेची सुरुवात भाग्यनगरमध्ये केल्याचं ते म्हणाले होते. 

तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. 

Related posts