( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात (silkyara tunnel) 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना अखेर मंगळवारी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करुन 41 मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी सुटलेल्या कामगारांची भेट घेतली. मात्र बोगद्यातून बाहेर आलेल्या एका मजुरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या एका मजुरांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मुजरांची त्यांचे कुटुंबिय गेल्या 17 दिवसांपासून वाट पाहत होते. बोगद्यातून बाहेर पडल्यावर मजुराच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पण या 41 मजुरांमध्ये एक मजूर असा होता की त्याच्या चेहऱ्यावरचे हसू काही मिनिटांतच नाहीसे झाले. कारण त्याच्या डोक्यावरुन वडिलांची सावली नाहीशी झाली होती. भक्तू मुर्मू असे या दुर्दैवी मजुराचे नाव असून तो झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील रहिवासी आहे.
झारखंडच्या बंकीशीलमधील 29 वर्षीय भक्तू मुर्मू हा देखील त्या 41 मजुरांसह बोगद्यात अडकला होता. मात्र भक्तू बोगद्यात अडकल्याची माहिती त्याचे बसेत उर्फ बारसा मुर्मू यांना कळली. त्यांना या घटनेचा इतका जबर धक्का बसला की त्यांची प्रकृती खालावली. अखेर मुलगा बाहेर येण्याआधीच बसेत मुर्मू यांचा मृत्यू झाला. मुलगा सुखरूप बाहेर येण्याची वाट पाहत असलेले 70 वर्षीय बसेत मुर्मू यांचे मंगळवारी निधन झाले. भक्तू मुर्मू 17 दिवसांनी बोगद्यातून बाहेर आला आणि वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्यालाही अश्रू अनावर झाले होते.