( प्रगत भारत । pragatbharat.com)
Railway Board On Coromandel Express Crash: ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी बाहानगामध्ये झालेल्या भीषण ट्रेन अपघातामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातासंदर्भात रेल्वे बोर्डाने आज (4 जून 2023) पत्रकार परिषद घेऊन नेमका अपघात कसा घडला यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा यांनी नेमका घटनाक्रम प्रसारमाध्यमांना सांगितला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेसचा (Coromandel Express) आधी अपघात झाला असं वर्मा म्हणाल्या. काही गैरसमज आम्ही दूर करु इच्छितो असं म्हणत त्यांनी सर्व जखमी प्रवाशांना दुर्घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आलं असून सध्या या मार्गावरील ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे अशी माहिती दिली.
गाड्या न थांबता निघून जातात
बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ 2 जून 2023 रोजी सायंकाळी 6.55 मिनिटांनी हा अपघात घडल्याचं रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं. कोरोमंडल एक्सप्रेसचा आधी अपघात झाला. या रेल्वे स्थानकावर ज्या इतर गाड्या उभ्या होत्या त्यांनाही या अपघाताचा फटका बसला. दोन्ही एक्सप्रेस गाड्या वेगवेगळ्या मार्गाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणं अपेक्षित होतं. बहनगा बाजार स्टेशनवर 2 मेन लाइन आहेत. ट्रेन या स्थानकावर न थांबता निघून जातात. याच स्थानकाजवळ 2 लूप लाइन असून या लाइनवर गाड्या थांबवल्या जातात, असं सांगण्यात आलं.
गाडी मर्यादेपेक्षा अधिक वेगात?
रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार लूप लाइनवर 2 गाड्या उभ्या होत्या. इतर गाड्यांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन देण्याच्या उद्देशाने या दोन गाड्या लूप लाइनवर उभ्या करण्यात आलेल्या. चेन्नईच्या दिशेने यशवंतपुर एक्सप्रेस बंगळुरुवरुन (Bengaluru-Howrah Superfast Express) येत होती त्याचवेळी मोठा आवाज झाला. ही गाडी कोरोमंडल एक्सप्रेसच्या काही सेकंद आधी होती. दुसरीकडे शालीमार रेल्वे स्थानकावरुन निघालेली कोरोमंडल एक्सप्रेस चेन्नईच्या दिशेने जात होती. कोरोमंडलला सर्व ग्रीन सिग्नल देण्यात आलेले. त्यामुळे गाडी अती वेगात होती असं म्हणता येणार नाही असं बोर्डाने स्पष्ट केलं.
नक्की वाचा >> Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?
गाड्यांचा वेग नेमका किती होता?
ग्रीन सिग्नल असल्याने मोटरमन न थांबता वेगाने त्या भागातून जाऊ शकतो. त्यामुळे 128 किमी प्रती तास वेगाने कोरोमंडल एक्सप्रेस धावत होती. यशवंत एक्सप्रेसलाही ग्रीन सिग्नल असल्याने ती 126 किमी वेगाने धावत होती. दोन्ही गाड्या ग्रीन सिग्नलनुसार वेगमर्यादेतच होत्या. दोन्ही गाड्यांनी सरळ जावं असं सिग्नलवरुन निर्देशित होत असल्याने वेग कमी करण्यात आला नाही. मागील 36 तासांपासून रेल्वेमंत्री अश्वीन वैष्णव घटनास्थळी असून ते मदतकार्य आणि इतर गोष्टींवर लक्ष ठेऊन असल्याचंही बोर्डाने सांगितलं. प्राथमिक तपासामध्ये सिग्नलिंगमध्ये बिघाड निर्माण झाल्याने अपघात घडला. सध्या रेल्वे कमिश्नरच्या देखरेखीखाली तपास सुरु आहे. संपूर्ण तपास झाल्यानंतरच तपशील देता येईल. रेल्वे सेफ्टी कमिश्नरच्या सविस्तर अहवालाची प्रतिक्षा असून हा अपघात फक्त कोरोमंडल एक्सप्रेसचा झाला. अनेक ट्रेन्स एकमेकांना धडकल्या असं म्हणणं चुकीचं ठरेल. केवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाल्याने हे घडलं. मात्र कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात नेमका कसा झाला याचा शोध घेतला जात आहे.
नक्की वाचा >> Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?
त्या मालगाडीमध्ये होतं लोखंड
जया वर्मा यांनी कोरोमंडल एक्सप्रेस ही सर्वात सुरक्षित ट्रेन्सपैकी एक असल्याचं सांगताना ही ट्रेन ट्रॅकवरुन पलटी होत नाही. मात्र या अपघातामध्ये सर्व इम्पॅक्ट हा थेट ट्रेनवर आला. जगात कोणतंही असं तंत्रज्ञान नाही जे एवढा मोठा धक्का सहन करु शकेल. लूप लाइनवरील मालगाडीमध्ये लोखंड असल्याने पॅसेंजर ट्रेनला जोरदार धक्का बसला. मालगाडीमध्ये वजन मोठ्या प्रमाणात असल्याने मालगाडी जागचीही हलली नाही. या अपघातामुळे कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावर विखुरले गेले. यापैकी काही डब्बे डाऊन लाइनवरील यशवंतपुर एक्सप्रेसला धडकले. त्यामुळे या डाऊन मार्गावरील ट्रेनचे काही डब्बे बाजूला पडले. अचानक हे सारं घडल्याने यशवंतपुर एक्सप्रेसमधील काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.