Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका वाढला असून काही भागांमध्ये तर, रक्त गोठवणारी थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर भारतामध्ये सुरु असणाऱ्या या थंडीमुळं शीतलहरी भारतातील उर्वरित राज्यांच्या दिशेनं वाहत आहेत. ज्यामुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाच मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी धुळ्यामध्ये 7.5 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांहूनही कमी नोंदवण्यात आलं. 

महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसोबतच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. कोकणापासून गोव्याच्या किनारपट्टी भागापर्यंतसुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर, मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्येसुद्धा गार वाऱ्यांमुळं थंडीची जाणीव होत आहे. पुढील 24 तासांमध्ये हवामानाची ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

काश्मीरमध्ये सुरु होतोय ‘चिल्लई कलां’…. 

काश्मीरमध्ये थंडी सध्या प्रचंड वाढत असून, हा काळ पुढील 40 दिवसांपर्यंत कायम राहणार आहे. थोडक्यात इथं (Chillai Kalan) चिल्लई कलां सुरु होत असून, येत्या 40 दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होणार आहे. रक्त गोठवणारी थंडी धडकी भरवणार आहे. ज्यामुळं काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि मैदानी भागांमध्ये शीतलहरींचा मारा अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. 

काश्मीरमध्ये पडलेल्या या कडाक्याच्या थंडीचे परिणाम येथील पर्यटनावर होणार असून वाहतुकीच्या मार्गांवरही खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासकीय यंत्रणांनी केलं आहे. दरम्यान, हिवाळ्यातील या लाटेचे परिणाम राजस्थानपर्यंत पाहायला मिळत असून, राजस्थानातील काही भागांमध्ये तापमान 1.3 अंशांवर पोहोचलं आहे. हे तापमान पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या वातावरणामध्ये हरियाणा, चंदीगढ, अमृतसर आणि उत्तर प्रदेशात धुक्याची दाट चादर असल्यामुळं दृश्यमानता कमी राहील. 

 

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये लक्षद्वीप, अंदमान निकोबर बेट समुहांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. तर, तामिळनाडूतील काही क्षेत्रातही पाऊस हजेरी लावून जाणार आहे. दक्षिण भारतातील बहुतांश भागांमध्ये वातावरण ढगाळ राहील अशी शक्यता आहे. 

Related posts