( प्रगत भारत । pragatbharat.com)
Congress Foundation Day : काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात दिघोरी नाक्याजवळील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. नागपुरात राहुल गांधींनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. मात्र, भाजपने (BJP) त्यांच्या भाषणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. लोकांना वाटते की स्वातंत्र्य लढा हा केवळ इंग्रजांविरुद्ध लढला गेला. पण हा लढा इंग्रजांसह राजे-सम्राटांच्या विरोधातही होता, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पक्षाच्या योगदानासह अनेक मुद्द्यांवर भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मात्र या भाषणादरम्यान, पुन्हा एकदा राहुल गांधींची जीभ घसरली. राहुल गांधी हे काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध कसा लढा दिला आणि काँग्रेसच्या लढ्याचा इतिहास सांगत असताना हा प्रकार घडला. “इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता,” असे राहुल गांधी म्हणाले. या विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकांना वाटते की स्वातंत्र्यलढा फक्त ब्रिटिशांविरुद्ध होता. नव्हे, इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणताना दिसत आहेत. अवघ्या 14 सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा समाचार घेतला आहे. दिल्ली भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. “आयें. इंग्रजांचे युद्ध इंग्रजांविरुद्ध होते. राहुल बाबा,” असे कॅप्शन शेहजाद पूनावाला यांनी दिलं आहे.
Aayein
“अंग्रेजों की लडाई अंग्रेजों के खिलाफ थी” Rahul Baba pic.twitter.com/zyLsuRMX2A
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) December 28, 2023
दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिगुल वाजवलं आहे. देशाला स्वातंत्र्यपूर्व गुलामगिरीच्या काळात नेत असल्याचा आरोप करत राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला. “भाजपची विचारधारा ही राजा-महाराजांची विचारधारा ते असून कोणाचेही ऐकत नाही. भाजपमध्ये वरून आदेश येतात आणि सर्वांना पाळावे लागतात. तर काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचा आवाज येतो आणि आम्ही त्याचा आदर करतो. काँग्रेसमध्ये अगदी लहान कार्यकर्ताही आम्हाला अडवून आपले मत मांडू शकतो. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने असंख्य लोकांना पुन्हा गरिबीच्या खाईत ढकललं आहे,” असा दावाही राहुल गांधींनी केला.
“आपली विचारधारा सांगते की देशाचा लगाम देशातील जनतेकडेच राहिला पाहिजे आणि देश राजेशाहीप्रमाणे चालत नाही तर लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. संविधानिक संस्था जनतेच्या मतांमुळे निर्माण होतात, मात्र आरएसएसने सर्व संस्था काबीज केल्या आहेत. एकाच विचारसरणीच्या लोकांमधून विद्यापीठांचे कुलगुरू नेमले जात आहेत,” असेही राहुल गांधी म्हणाले.