RTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, ‘तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वामध्ये (Business) मोठं नाव कमवून महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) या उद्योगसमुहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी कायमच तरुणाईच्या मनात घर केलं आहे. तरुणाईला भावणाऱ्या कल्पनांना दुजोरा देत, त्यांना प्रोत्साहन देत आणि सतत नवनवीन संकल्पनांवर चर्चा करत इतरांचेही सल्ले विचारात घेण्याच्या आणि सर्वांसोबत पुढे जाण्याच्या शैलीमुळं आनंद महिंद्रा अनेकांच्याच आवडीचे. म्हणूनच की काय, सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सचा आकडा दिवसागणिक वाढत असतो. 

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणाऱ्या महिंद्रा कायमच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. एखाद्याची संकल्पना पसंत आली, तर त्यावर ते चर्चा करत अनेकदा सुधारणाही सुचवतात. आता त्यांनी जी पोस्ट केली आहे ती पाहण्यासाठी नेटकरी वेळातून वेळ काढताना दिसत आहेत. 

काय आहे या व्हिडीओमध्ये? 

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल सोफाच तो, नवल काय? तर, हा साधासुधा सोफा नाही, कारण व्हिडीओमध्ये पुढच्याच क्षणाला हा सोफा एका गाडीमध्ये रुपांतरित होताना दिसत आहे. ऑर्डर केलेल्या सोफ्याला शक्कल लावून आणि आपल्या ज्ञानाचा वापर करून वाहनामध्ये रुपांतरित करणाऱ्या या तरुणांचं आनंद महिंद्रा यांना मोठं कौतुक वाटतंय. 

बरं, ही दोघं जेव्हा फेरफटका मारण्यासाठी म्हणून या सोफावजा वाहनातून भटकंतीसाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याकडे रस्त्यावरील ये-जा करणारी मंडळीसुद्धा मोठ्या कुतूहलानं पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओबाबत आपली प्रतिक्रिया देताना महिंद्रा यांनी लिहिलं, ‘पाहा, त्यांची समर्पकता पाहा… त्यासाठी करण्यात आलेले इंजिनिअरिंगचे प्रयत्न पाहा. देशाला जर ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठं नाव व्हायचं असेल तर, अशा पद्धतीच्या संशोधनाची गरज आहे.’

इतक्यावरच न थांबता पुढं महिंद्रा यांनी चक्क आरटीओ अधिकाऱ्यांना चॅलेन्ज देत, हा आविष्कार पाहून त्यांची प्रतिक्रिया काय असेल, त्यांचे चेहरे मला बघायतेयत अशी आगळीवेगळी इच्छा गमतीनं व्यक्त केली. 

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला, की तो अनेकांनी पाहिला, काहींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आणि काहींनी महिंद्रा यांच्याप्रमाणं त्या तरुणांच्या कौशल्याची प्रशंसाही केली. तुम्हाला हा व्हिडीओ आणि ही किमया कशी वाटतेय? 

Related posts