‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. पण हॉटेल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्नाटक पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.

‘मासिक पाळीचं रक्त’

पोलीस हत्या झालेल्या हॉटेल रुममध्ये पोहोचले असता तिथे जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते. यावेळी सूचना सेठने हे माझ्या मासिक पाळीचं रक्त आहे सांगत पोलिसांची दिशाभूल कऱण्याचा प्रयत्न केला अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 39 वर्षीय सूचना सेठ सध्या सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. 

सूचना सेठ हॉटेलमधून बाहेर पडली असता तिच्यासोबत तिचा मुलगा असल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी रुममध्ये जाऊन पाहिलं असता रक्ताचे डाग पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. सूचना सेठच्या हातात मोठी बॅग असल्याने त्यांना शंका आली आणि थेट पोलिसांशी संपर्क साधला. 

पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत सूचना सेठ प्रवास करत असलेल्या कॅबच्या चालकाला फोन केला. त्यांनी त्याला सूचना सेठला कळू न देता जवळचं पोलीस स्टेशन गाठण्यास सांगितलं. यानंतर पोलिसांनी सूचना सेठला मुलगा कुठे आहे असं विचारलं असता, तो मित्राच्या घरी असल्याचं उत्तर तिने दिलं.

सूचना सेठला रक्ताचे डाग कसे पडलेत असं विचारण्यात आलं असता तिने ते मासिक पाळीचं रक्त असल्याचं म्हटलं. “आरोपीने आम्हाला सांगितलं की, मासिक पाळीमुळे ते रक्ताचे डाग पडले होते. मुलगा मित्राच्या घरी असल्याचं सांगत तिने पत्ताही दिला,” अशी माहिती पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली आहे. पोलिसांनी शोध घेतला असता हा पत्ता खोटा असल्याचं उघड झालं. 

पतीसोबत घटस्फोट झाल्याने तणावात होती सेठ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबतच्या नात्यात तणाव असल्याने महिलेने हे कृत्य केलं. मुलाला वडिलांपासून दूर कसं करावं यावरील उपाय ती शोधत होती. पण ती मुलाची हत्या केरल असा विचार कोणीही केला नव्हता. मुलाला गोवा फिरवण्याच्या नावाखाली ती घेऊन पोहोचली आणि हत्या केली. 

पोलिसांना सांगितलं हत्येचं कारण

पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता उत्तर ऐकून तेदेखील चक्रावले. मुलाने त्याच्या वडिलांना भेटू नये अशी आपली इच्छा होती, पण कोर्टाच्या आदेशामुळे आपण हतबल होते. यामुळेच आपण मुलाची हत्या केली. जेणेकरुन पती त्याला भेटू शकणार नाही असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सूचना सेठ यांना अटक केली असून, यासंबंधी पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Related posts