( प्रगत भारत । pragatbharat.com)
13 January 2023 Weather Update: मुंबईमध्ये नागरिकांना पूर्णपणे थंडीचा अनुभव घेता आलेला नाही. जानेवारी सुरु झाल्यापासून थंडी अचानक गायब झाल्यासारखी दिसून आली. याउलट मुंबईकरांना दुपारच्या वेळेस उकाड्याचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असून नागरिकांना आजही थंडीचा अनुभव घेता येणार नाहीये.
देशात पुढच्या 24 तासांत कसं राहणार हवामान
स्कायमेट हवामान अहवालानुसार, 13 ते 16 जानेवारी दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात सकाळी धुकं पडू शकते. 13 ते 16 जानेवारी दरम्यान पश्चिम बंगाल, ओडिशा, जम्मू, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुराच्या काही भागात धुकं दिसून येणार आहे. याशिवाय पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात थंड दिवसापासून गंभीर थंड दिवसाची स्थिती कायम राहू शकते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे कमाल तापमान 19.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. जे या सिझनमधील सरासरी तापमानापेक्षा एक अंश कमी असल्याची नोंद करण्यात आलीये. तर किमान तापमान 3.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेलंय. हे तापमना या सिझनमधील सरासरी तापमानापेक्षा तीन अंशांनी कमी आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमानात काहीशी घट होईल. तसेच आकाश काही प्रमाणात निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पश्चिमी प्रकोपानंतर उत्तरेकडून वारे वाहू लागले तर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.