( प्रगत भारत । pragatbharat.com)
Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि तुमचे डोळे पाणावतील.
वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे. पाली जिल्ह्य़ात चार भाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अनोखा स्नेह दिसून आला. यातील दोन भावांचा तासाभराच्या अंतरात मृत्यू झाला. दुसऱ्या भावाच्या मृत्यूचे कारण खूपच भावनिक करणारे होते. त्यामुळे आजुबाजूच्या सर्वांनाच याचे जास्त दु:ख झाले. जवळपासची अनेक गावे या दोन भावांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमली. सर्वांनाच अश्रू आवरणे कठीण झाले होते. असे नेमके काय घडले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पाली जिल्ह्यातील रुपवास गावातील. गावात असलेल्या एका मोठ्या घरात चार भाऊ आणि त्यांचे कुटुंब एकत्र राहतात. यापैकी ज्येष्ठ बंधू बुधाराम हे सुमारे नव्वद वर्षांचे होते. मंगलराम त्यांच्यापेक्षा लहान, दुर्गाराम तिसर्या क्रमांकावर आणि मांगीलाल चौथ्या क्रमांकावर आहे. चौघा भावांचे वय 90 ते 75 दरम्यान आहे. दरम्यान चार भावांमध्ये खूप स्नेह असे. त्यांची भावबंदकी बघून गावातही त्यांचे उदाहरण दिले जायचे. चारही भाऊ दिवसाचा बराचसा वेळ एकत्र घालवतात.
आनंदी घरावर शोककळा
दरम्यान काही दिवसांपूर्वी आनंदी घरावर शोककळा पसरली. चारपैकी तिसरा भाऊ दुर्गाराम यांची प्रकृती खालावत चालली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सर्वांनी त्यांची काळजी घेतली. असे असतानाही त्यांची प्राणज्योत मालवली.
धाकटा भाऊ आजारी असल्याचे थोरला भाऊ बुधारामला माहीत होते. घरच्यांकडून त्यांना याबाबत माहिती मिळत राहिली. धाकटा भाऊ आपल्याला सोडून कायमचा निघून गेल्याचे दु:ख साऱ्या घराला झाले. पण थोरले भाऊ बुधाराम यांनी या घटनेचा मोठा धसका घेतला. त्यांची प्रकृती अचानक ढासळू लागली. घरात आधीच एक वाईट घटना घडल्याने कुटुंबियांना कोणती रिस्क घ्यायची नव्हती. त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. बुधाराम यांच्यावर सुरु होणार पण इतक्यातच या कुटुंबाला दुसरा धक्का बसला.
मोठ्यासाठी झटका
बुधाराम यांचा श्वास थांबल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.बुधाराम आणि दुर्गाराम यांच्यात खूप प्रेम होते. ते पूजा आणि इतर दैनंदिन कामे एकत्र करायचे. अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सानिध्यात होते. त्यामुळे लहान भावाचा मृत्यू हा थोरल्या भावासाठी मोठा झटका होता.
गावकरीही झाले दु:खी
तासाभरात दोन भावांच्या निधनाचे वृत्त साऱ्या गावात हाहा म्हणता आजूबाजूच्या गावातही पसरले. लोकांना आधीच या भावांतील सख्य माहिती होते. त्यामुळे सर्वांनाच अत्यंत वाईट वाटले. अनेक लोक या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. दोघांच्या चितेवर संपूर्ण गावाने अश्रू ढाळले. आजच्या काळात भावा-भावातींल असे प्रेम पाहयला मिळत नाही, अशा शब्दात उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान दोघांच्या अंत्यसंस्कारावेळी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. असे प्रेम फक्त भगवान श्री राम आणि त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्यातच दिसल्याचे लोक सांगतात.