What Is Meaning Of SageSoyare Word Demand Manoj Jarange Patil for Maratha Reservation News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Meaning Of SageSoyare : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. ‘आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ’, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलंय. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच सगेसोरये म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 

मनोज जरांगे यांनी सगेसोयरे या शब्दाची व्याख्याही पत्रकार परिषदेत वाचून दाखवली होती. मराठा समाजाच्या नजरेत सगेसोयरे यांची व्याख्या नेमकी आहे तरी काय? यावर जरांगे यांनी उत्तर दिलं होतं. समाजातील सगेसोयरे व्याख्येनुसार, सर्वांना आरक्षण प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

‘सगेसोयरे’ची व्याख्या काय पाहुया…

मराठा समाजात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार गणगोतात, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी जरांगे यांची आहे. आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाचे नातेवाईक विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागात आहेत. ज्यांच्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी म्हणून आधीपासून दाखल आहेत. त्यामुळे सरकारने आश्वासन देताना ‘रक्तातील सगेसोयरे’ हा शब्द वापरला असल्यामुळे आता सरकारने मागे हटू नये आणि सरसकट सर्वांना आरक्षण द्यावं.

पहिल्यांदा सरकारने आमची मागणी मान्य केली होती. मात्र, आता त्यांनी मागे हटू नये. सरकारने आमची ही व्याख्या घेतली नाही. त्यात फक्त पितृसत्ताक टाकलं, मग आम्ही म्हटलं मातृसत्ताकही टाका.. मात्र, त्यांनी अजून आमची मागणी मान्य केली नाही, असं जरांगे यांनी म्हटलं होतं.

मराठा समाजातील महिलांच्या माहेरच्या नातेवाईकांना देखील सासरच्या आधारावर कुणबी दाखला मिळवा. मातृसत्ताक पद्धत म्हणत असाल तर आईकडील नातेवाईकांनाही सगेसोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये घ्या आणि त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्या, अशी मागणी जरांगे यांची आहे. पण सरसकट पद्धतीने जर वडील मराठा आणि आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली जाऊ शकत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केलीय. तसंच कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र  लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Related posts