( प्रगत भारत । pragatbharat.com)
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार ही भाजपात याबाबात अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मिलिंद देवरा शिंदे गट आणि भाजपा या दोघांच्याही संपर्कात आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंचा दक्षिण मुंबई मतदारसंघ सोडण्यास नकार
दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढत असताना उद्धव ठाकरे यांनी जागा सोडणारच नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडणार का? याकडे लक्ष आहे. महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथाल यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व ठेवायचे असेल तर किमान दोन तीन जागा लढवायवा हव्या असं स्थानिक नेत्यांचं मत होतं.
विशेषतः दक्षिण मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत त्याच ठिकाणी मिलिंद देवरा यांनी दावा केला. पण बंडखोरीनंतर आपल्या बाजूने ठाम उभे राहिलेल्या अरविंद सावंत यांना येथून उमेदवारी देण्यावर उद्धव ठाकरे ठाम असल्याने काँग्रेस पक्षाला पडती बाजू घ्यावी लागणार आहे. यामुळे मिलिंद देवरा नाराज आहेत.
यामुळेच मिलिंद देवरा आता काँग्रेसचा हात सोडून जो पक्ष दक्षिण मुंबई मतदारसंघ देईल त्याच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. यासाठी ते शिंदे गट आणि भाजपा या दोघांच्या संपर्कात आहेत. पण मिलिंद देवरा यांच्यासाठी शिंदे गट, दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असला तरी भाजपा हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. अशा स्थितीत जर भाजपाने दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्याकडेच ठेवला तर मिलिंद देवरा भाजपाचाही पर्याय निवडू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.
पण भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. नार्वेकर यांची तयारी आहे. लोढा यांनाही खासदारकीची इच्छा आहे. त्यामुळे अनेक अंदाज बांधले जात आहेत.
दिल्लीत आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न
शिंदे गटाचा नवी दिल्लीत कोणीही चेहरा नाही आणि मिलिंद देवरा यांचं दिल्लीतील अस्तित्व लक्षात घेता त्यांना पक्षात घेत महत्त्वाची भूमिका देण्याचा प्रयत्न असेल. यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं समजत आहे. त्यामुळे मिलिंद देवरा पुढील काळात वेगळा निर्णय घेणार की दिल्ली हायकमांड देवरा यांची समजूत काढणार याकडे लक्ष लागलं आहे.