( प्रगत भारत । pragatbharat.com)
Axar Patel BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले.
अक्षरला मिळाला पुरस्कार
अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये अक्षरने केलेल्या दमदार कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. 3 सामन्यांमध्ये अक्षरने 27 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 10.59 च्या सरासरीने या विकेट्स घेतलेल्या. याच पार्श्वभूमीवर त्याला आगामी भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
अक्षरला काय विचारण्यात आलं? आणि तो या म्हणाला?
अक्षर पटेलला आगामी कसोटी मालिकेसाठी तुझे प्लॅन्स काय आहेत असा प्रश्न समालोचक हर्षा भोगलेंकडून विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना अक्षर पटेलने माझा प्लॅन टॉप सिक्रेट आहे असं म्हटलं. आपला प्लॅन न सांगण्यामागील कारण देताना अक्षर पटेल इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्युलम समोर बसल्याचं नमूद करायला विसरला नाही.
“हे टॉप सिक्रेट आहे. पुढील काही दिवसांमध्ये मालिका सुरु होत असल्याने मी याबद्दल खुलासा करणार नाही. तुम्हीच तर म्हणालात की मॅक्युलम समोर बसला आहे,” असं उत्तर अक्षर पटेलने दिलं. त्याचं उत्तर ऐकून ब्रॅण्डन मॅक्युलमबरोबरच सर्वच उपस्थित जोरजोरात हसू लागले.
— cricket videos (@RizwanStum60450) January 24, 2024
फिरकीचा दरारा
फिरकी खेळपट्टीबरोबर जुळवून घेण्यास इंग्लंडच्या फलंदाजांना अपयश आल्याने मागील कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. 3-1 ने इंग्लंडने मालिका गमावली होती. खेळ भावनेला धरुन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या नसल्याची टीका त्यावेळी झाली होती. मात्र भारतीय खेळाडूंनी घरच्या मैदानांवरील खेळपट्ट्या घरच्या संघाला साजेश्या बनवण्याचा हक्क असल्याचा युक्तीवाद केला होता.
पहिल्या दिवसापासूनच फिरकी
भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांचा वापर केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इंग्लंडनेही खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल असं गृहित धरुनच सराव सुरु केला आहे. इंग्लंडच्या संघाने 3 फिरकीपटूंचा संघात समावेश केला आहे. हैदराबादमध्ये 25 तारखेपासून 29 तराखेपर्यंत मालिकेतील पहिली कसोटी खेळवली जाणार आहे.