तरुणाने पत्नी, मुलासह आनंदी क्षण घालवतानाचा फोटो केला शेअर; पुढच्याच क्षणी लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलकात्यात एका 32 वर्षीय तरुणाची त्याच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने आपल्या कुटुंबासह फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्यासह पत्नी आणि लहान मुलगा होता. तिघेही फोटोत आनंदात दिसत होते. हा फोटो शेअर करताना त्याने ‘कुटुंब’ अशी कॅप्शन दिली होती. पण काही तासांनी कुटुंबावर इतका मोठा दु:खाचा डोंगर कोसळेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं नाव संहती पॉल आहे. ती घटस्फोटित असून एका मुलाची आई आहे.  तर पीडित तरुणाचं नाव सार्थक दास होतं. सार्थक फोटोग्राफर होता. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एका भाड्याच्या घऱात लिव्ह-इनमध्ये राहत होते. 

सार्थक दासच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे आणि संहती पॉलचे फोटो आहेत. या फोटोंमध्ये सनहाती पॉलचा मुलगाही आहे. त्याने आपला रिलेशनशिप स्टेटसही बदलून Engaged असा ठेवला होता. पण दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. त्यांच्यातील वाद आता नेहमीच भाग झाले होते. बुधवारी याच भांडणारम्यान संहिता पॉलने चाकून सार्थकवर हल्ला केला. तिने एकापेक्षा जास्त वार करत त्याला ठार केलं. 

हत्या केल्यानंतर सनहाती पॉलने पोलिसांना फोन करुन गुन्ह्याची माहिती दिली. फोन येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. कोलकाताच्या उत्तर 24 परगनामधील दमदम परिसरात ते राहत होते. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सार्थकचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या शरिरावर चाकूने एकापेक्षा जास्त वार करण्यात आले होते. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

पोलिसांनी संहती पॉलची चौकशी केली असता तिने सार्थकची हत्या केल्याची कबुली दिली. पण तिने आपल्याच लिव्ह-इन पार्टनरला ठार का केलं याचं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. “आम्ही महिलेला अटक केलं असून हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. तिने आपला गुन्हा कबूल केला आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Related posts