“हिंदूंनी ठरवलं तर अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील,” कोणी केलं हे विधान?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अमेरिकेचं (USA) सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिलमध्ये (Capital Hill) बुधवारी हिंदू-अमेरिकी शिखर संमेलनाचं (Hindu American Summit) आयोजन करण्यात आलं. हिंदू-अमेरिकी समुदायाला समर्थन देणारे अनेक अमेरिकी खासदार या संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे खासदार मैककॉर्मिक (Republican Rich Mccormick) यांनी यावेळी अमेरिकेच्या विकासात तुमचा मोठा सहभाग आहे अशा शब्दांत कौतुक केलं. इतकंच नाही तर या समुदायाकडे अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील इतकी ताकद असल्याचं विधान केलं आहे. 

बुधवारी झालेल्या या संमेलनाची सुरुवात वैदिक जप करत झाली. Americans4Hindus तर्फे आयोजित या शिखर संमेलनात देशभरातील हिंदू नेत्यांनी सहभाग घेतला होता. तसंच इतर 20 संघटनांनीही या संमेलनाला समर्थन दिलं. Americans4Hindus चे चेअरपर्सन आणि हिंदू-अमेरिकी शिखर संमेलनाचे मुख्य आयोजक रोमेस जापरा यांचं म्हणणं आहे की, “आपली हिंदू मूल्ये अमेरिकेच्या संवैधानिक मूल्यांशी पूर्णपणे सुसंगत आहेत. अमेरिकेतील नागरिक गीता वाचतात. त्यामुळे आम्ही हिंदू-अमेरिकन नागरिकांना आवाज देण्यासाठी कटिबद्ध आहोत”. 

जापर यांनी सांगितलं की, “हे पहिलं शिखर संमेलन आहे जे आम्ही राजकीय नाती जोडण्यासाठी आयोजित केलं आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम केलं आहे. पण राजकीयदृष्ट्या आम्ही फार मागे आहोत. आम्हाला वाटतं हिंदू-अमेरिकन नागरिकांसह भेदभाव केला जातो. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्र आणण्याचा विचार आम्ही केला”. 

संमेलनात सहभागी झालेले रिपब्लिकन खासदार रिच मॅककॉर्मिक यांनी सांगितलं की “हिंदू-अमेरिकन नागरिकांसाठी माझ्या मनात फार आदर आहे. त्यांनी अमेरिकेत फार योगदान दिलं आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं आहे. हा समुदाय जागरुक असतो हे मी वारंवार सांगत आहे. आपल्याकडे किती ताकद आहे याची जाणीव झाल्यावर त्यांना जाणवतं की, आपण अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवू शकतो”. 

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत भारतीय आणि हिंदूंचं वर्चस्व वाढत आहे. 2015 मधील प्यू रिसर्च सेंटरच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत हिंदू धर्म मानणाऱ्यांची संख्या चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. 2007 ते 2014 दरम्यान हिंदूंची लोकसंख्या जवळपास 85 टक्क्यांनी वाढली आहे. 2007 मध्ये अमेरिकेत हिंदूंची लोकसंख्या 0.4 टक्के होती. 2017 मध्ये ती वाढून 0.7 टक्के झाली. 

रिपोर्टनुसार, अमेरिकेत जवळपास 20 लाख भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे. यामधील सर्व हिंदू नाहीत. पण 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात प्रथम हिंदू कार्ड बाहेर काढलं होतं. 2016 मध्ये एका सभेत बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, “आम्ही हिंदूंवर प्रेम करतो. आम्ही भारतावर प्रेम करतो. मी हिंदू धर्म आणि भारताचा मोठा चाहता आहे”. 

निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्वासन दिलं होतं की, जर आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर भारतीय आणि हिंदू समाजाशी चांगली मैत्री निभावणार. ट्रम्प या निवडणुकीत जिंकले होते. मात्र निवडणुकीनंतर झालेल्या सर्व्हेत फक्त 16 टक्के हिंदूंनी डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिल्याचं समोर आलं होतं. ट्रम्प सरकारने निवडणूक जिंकल्यानंतर 80 भारतीय अमेरिकन्सकडे प्रमुख पद सोपवलं होतं. 

Related posts