सूरतने करुन दाखवलं! World Yoga Day निमित्त थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yoga Day Event Guinness World Record: गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी जागतिक योग दिनानिमित्त गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) नोंदवल्याची घोषणा केली आहे. सूरतमध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक लोकांनी योगासने करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये 1 कोटी 25 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवल्याचं गुजरात सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 

विक्रम मोडीत निघाला

संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लाखाहून अधिक लोकांनी आज आयोजित कार्यक्रमात योगासनं केली. यामुळे आधीचा विक्रम मोडीत निघाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी राज्यभरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक योग दिना’च्या कार्यक्रमामध्ये सूरत येथील दुमासमधील कार्यक्रमात योगासने करत सहभाग नोंदवला. ड्रोन कॅमेरांच्या सहाय्याने या कार्यक्रमाचं रेकॉर्डींग करण्यात आलं.

…अन् टाळ्यांचा कडकडाट

आज पहाटे सुरतमध्ये आयोजित कार्यक्रम सुरु होण्याआधी उपस्थितांना संबोधित करताना संघवी यांनी राज्यात 72 हजार ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच या 72 ठिकाणी एकूण 1 कोटी 25 लाख लोक सहभागी होतील असंही संघवींनी सांगितलं. “सूरतमध्ये योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाने नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. एकाच ठिकाणी योगासने करण्यासाठी सर्वाधिक संख्येनं लोक जमा झाल्याचा हा विक्रम आहे,” असं संघवी यांनी उपस्थितांना सांगितल्यानंतर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरामध्ये योग अभ्यासाला लोकप्रियता मिळवून दिली असं गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांनी म्हटलं.

21 योग स्टुडिओ उभारणार

“कोरोना साथीच्या काळामध्ये योग आणि प्राणायामामुळे अनेकांना फायदा झाल्याचं आपण पाहिलं,” असं पटेल यांनी म्हटलं. तसेच यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार राज्यभरात 21 योग स्टुडिओ सुरु करणार असल्याचं जाहीर केलं. योग अभ्यासाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे स्टुडिओ उभारले जाणार आहेत. “राज्यातील योग बोर्डाने आतापर्यंत 5 हजार योग प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्य सरकार 21 योग स्टुडिओ राज्यभरात सुरु करणार आहेत,” असं मुख्यमंत्री पटेल म्हणाले. 

गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबरच भारतीय जनता पार्टीचे आमदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित योग अभ्यास कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली.

Related posts