International Yoga Day: योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

International Yoga Day 2023: आज संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जात आहे. 21 जूनला योग दिन म्हणून स्थापित करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फार महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र संघाला (United Nations) भेट देणार आहेत. या ठिकाणी आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा कऱण्यास मान्यता मिळाली होती.

2015 मध्ये सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला होता. . ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्पना असल्याचं माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन (Syed Akbaruddin) यांनी सांगितलं होतं. “जुलै 2014 मध्ये आम्ही (पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या) पहिल्या न्यूयॉर्क दौऱ्याची आखणी करत होतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला पुढे आणून आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेण्याची गरज असल्याचं जाहीर करत आम्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला”.

अशा प्रकारे सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमध्ये एका शक्तिशाली गोष्टीचा प्रारंभ झाला. आज आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारताचे प्रतीक नाही तर जगभरातील भारतीय मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

“परराष्ट्र धोरणांमध्ये कधीही योगाला प्राधान्य देण्यात आलं नसल्याने आम्हा सर्वांना फारच धक्का बसला. पुढे त्यांनी 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जावा असं सुचवलं. त्यांनी एक सर्वसमावेशक योजना तयार केली. ही योजना वर्षभरात पूर्ण करावी असा त्यांचा आग्रह होता. कारण त्यांना 2015 मध्ये योग दिन साजरा करायचा होता,” असं सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं.

यानंतर तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी राजदूत अशोक मुखर्जी यांनी एक योजना मांडली. “मोजक्या वेळेत त्यांनी एक पूर्ण योजना आखली होती. फक्त 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीत 170 देशांना सह-प्रायोजक म्हणून सहभागी करुन घेण्यातही ते यशस्वी ठरले,” असंही त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आणि त्यामुळे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन ठरला.

2014 मध्ये चीनकडून होणारा संभाव्य विरोध हा एक प्रमुख विचार होता. मात्र, भारत-चीन संबंधांसाठी तो काळ वेगळा होता. भारताला दिलासा देण्यासाठी, चीनने ठरावाला केवळ सहमती दर्शवली नाही तर तो पहिला सहप्रायोजक बनला.

“आंतरराष्ट्रीय योग दिनाने एक उद्देश, आदर्श समोर ठेवला. ठराव संमत झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रीय होण्याचं आमचं मिशन सक्षम झालं. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दिवस तितक्याच उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करतात. हा फ्क एक दिवसाचा कार्यक्रम नाही तर जीवनशैलीचा भाग करण्यात आला असून, हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी ते स्व: न्यूयॉर्कमध्ये आहेत,” असं सय्यद अकबरुद्दीन म्हणाले आहेत.

2015 मध्ये भारतात पार पडलेल्या पहिल्या योग दिन सोहळ्याने इतिहास रचला. यावेळी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाले. 35 हजार 985 व्यक्ती आणि नवी दिल्लीतील राजपथवर 84 विविध देशातील नागरिकांचा सहभाग हा फक्त एक रेकॉर्ड नव्हता तर तो एकतेचा एक क्षण होता. जेथे विविध संस्कृती एकमेकांत गुंफल्या आणि एकत्र आल्या. 

Related posts