रेल्वे प्रवासादरम्यान TTE तिकीट तपासायला आल्यास तुम्हाला माहित हवेत ‘हे’ नियम; हा तुमचा हक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Railway News : देशातील विविध राज्यांना, लहानमोठ्या शहरांना आणि अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातील गावांना जोडण्याचं काम भारतीय रेल्वेमार्फत केलं जातं. दर दिवशी या माध्यमाचा वापर करत लाखोंच्या संख्येनं नागरिक प्रवास करतात. यामध्ये तुमचाही समावेश असेल. प्रवास लहान असो किंवा मोठा, तुम्ही एकदातरी रेल्वेनं प्रवास केलाच असेल. काहींना तर, या प्रवासाची सवयच झाली असेल. पण, असं असतनाही तुम्हाला एक प्रवासी म्हणून मिळणाऱ्या काही हक्कांची कल्पना आहे का? 

रेल्वेनं प्रवास करताना एखाद्या दुरवर असणाऱ्या ठिकाणी जायचं झाल्यास अनेकजण रात्रीच्याच वेळी प्रवास करण्याला प्राधान्य देतात. या प्रवासादरम्यानच टीटीई रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाठी फेरी मारतो. पण, तुम्हाला माहितीये का, तुम्ही झोपेत असाल आणि त्यानं तुम्हाला उठवून तिकीट तपासणीची विचारणा केली, तर तुम्ही त्याला रोखू शकता. रेल्वेकडूनच तुम्हाला याची परवानगी देण्यात आली आहे. 

काय सांगतो नियम? (Indian Railway Rules)

भारतीय रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार धावत्या रेल्वेमध्ये टीटीई (TTE) सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतच्याच वेळेत तिकीट तपासू शकतो. याच वेळेत तो तुमचं ओळखपत्रही तपासू शकतो. रात्री 10 वाजल्यानंतर मात्र टीटीई तुमच्याकडे येऊन तिकीट तपासू शकत नाही. हो, पण याला काही अपवादही आहेत. 

सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतची तिकिट तपासणीची वेळ ही फक्त सकाळी प्रवास सुरु करणाऱ्या रेल्वे प्रवासांपुरताच मर्यादित आहे. तुम्ही जर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रवास सुरु केला असेल तर मात्र टीटीई तुमच्या आसनापाशी येऊन तिकीट तपासू शकतो. 

फरक ओळखा आणि व्हा स्मार्ट प्रवासी… 

रेल्वेनं प्रवास करत असताना समोर काळ्या कोटातील व्यक्ती आल्यास तो टीसी आहे असाच आपला समज होतो. तिकीट असतानाही काही मंडळी उगाचच या व्यक्तीला बाहून घाबरतात. पण, तुम्हाला मुळात टीटीई आणि टीसी यांच्याती फरक माहितीये का? 

कागदोपत्री नोंद आणि कामाच्या जबाबदारीनुसार टीटीई आणि टीसी ही दोन्ही मंडळी तिकीट पडताळणीचच काम करतात, तरीही त्यांच्यामध्ये फरक आहे. टीटीई म्हणजेच Ticket Checking Examiner चं काम असतं धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांचं तिकीट आणि त्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी करणं. तिकीट नसणाऱ्यांकडून दंडवसुली करणं आणि एखादी रिकामी Seat गरज भासल्यास दुसऱ्या प्रवाशाला देणं. 

टीसी अर्थात  Ticket Collector सुद्धा तिकीट तपासतो. पण, यांचं काम रेल्वेचं फलाट किंवा फलाटानजीकचा परिसर इथं तिकीटांची पडताळणी करणं. फलाटांवरून बाहेर जाणाऱ्या किंवा रेल्वेमध्ये जाणाऱ्या प्रवाशांकडे तिकीट आहे की नाही यावर टीसींची नजर असते. त्यामुळं यापुढे तुमच्यापुढे नेमका टीसी येतो की टीटीई हे आधी लक्षात घ्या. 

Related posts