फ्रान्समध्ये उसळली दंगलं; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मात्र पत्नीसह गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com)

France Riots : गेल्या तीन दिवसांपासून फ्रान्स (France) दंगलीच्या (Riots) विळख्यात अडकला आहे. फ्रान्समध्ये पोलिसांच्या (France Police) गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. हिंसक झालेल्या आंदोलकांनी बस, कारसह इमारतींनाही आग लावली. काही पोलिस ठाण्यांबाहेर तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे फ्रान्समधील मॅक्रोन सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन (emmanuel macron) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नीसह ब्रिटिश गायक एल्टन जॉनचा कॉन्सर्ट पाहत आहेत.

फ्रान्समधील प्रकरण इतके गंभीर झाले आहे की सिटी हॉलच्या अधिकाऱ्यांनी 3 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या परिसरात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. दुसरीकडे या दंगलीत सहभागी असलेल्या 180 हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यासोबतच त्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलावर गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र देशात दंगल सुरु असताना मॅक्रॉन हे पत्नीसह कॉन्सर्ट पाहत असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर एकामागून एक टिका करण्यात येत आहे. एकीकडे फ्रान्समधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दुसरीकडे मॅक्रॉन यांच्या या कृतीमुळे त्यांना नीरो ही पदवी दिली आहे. इतिहासात नीरोला रोमचा राजा म्हणून ओळखले जाते. रोम जळत असताना नीरो बासरी वाजवत होता असे म्हटले जाते.

नेमकं झालं काय?

27 जून रोजी पॅरिसमधील नुते शहरातील एका वाहतूक चौकीवर दोन पोलिसांनी कार थांबवली होती. त्यात तीन जण होते. 17 वर्षीय मुलगा नेल एम हा कार चालवत होता. थोडावेळ थांबल्यानंतर त्यांनी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असा दावा पोलिसांनी केला. यानंतर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये नेलचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात बंदूकही दिसत आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की नेल वाहतुकीचे नियम मोडत होता. तो थांबायलाही तयार नव्हता. मात्र कोणतीही चूक नसताना त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप नेलच्या कुटुंबीयांनी केला आहे. वर्णद्वेषामुळे हे घडल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या घटनेचे वृत्त पसरताच पोलिसांविरोधात निदर्शने सुरू झाली. गोळीबार होण्यापूर्वी पोलिस आणि कारमध्ये बसलेल्या लोकांमध्ये काय झाले हे अद्यापही समोर आलेले नाही. 

फ्रान्समध्ये काय परिस्थिती आहे?

आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेकडो सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या रस्त्यांवर 40 हजारांहून अधिक पोलीस गस्त घालत आहेत. पॅरिसमधील क्लेमार्ट या वेबसाइटनुसार रात्री 9 वाजल्यापासून अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.

Related posts