पुतीन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रिगोझिनची हत्या? बड्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wagner Chief Dead : काही दिवसांपूर्वी रशियाविरुद्ध अयशस्वी बंडखोरी करणाऱ्या खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या ठावठिकाण्याबाबत आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. वॅग्नर आर्मी (Wagner Army) चीफ येवगेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे जवळचे विश्वासू होते. पण काही दिवसांपूर्वी प्रीगोझिन आणि रशियन (Russia) सैन्य एकमेकांच्या विरोधात उभे होते. प्रीगोझिन यांनी 23 जून रोजी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुरुवारी रात्री एका रशियन वृत्तपत्राला माहिती देताना आता वॅग्नर ग्रुपच अस्तित्वात नाही असे पुतिन म्हणाले आहेत. त्यानंतर आता एका माजी अमेरिकन अधिकाऱ्याने दावा केला आहे की एकतर प्रिगोझिन मरण पावला आहे किंवा तो तुरुंगात आहे. 

निवृत्त अमेरिकन जनरल रॉबर्ट अब्राम्स यांनी हा दावा केला आहे. रॉबर्ट अब्राम्स यांच्या मते, पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात 29 जून रोजी भेट झाल्याचे म्हटले जात होते. मात्र ही माहिती खोटी आहे. आता आपण प्रिगोझिन यांना पुन्हा पाहू की नाही याबद्दल शाश्वती नाही. एकतर त्यांना मारण्यात आले आहे किंवा त्याला कोठडीत टाकण्यात आले आहे, असा दावा रॉबर्ट अब्राम्स यांनी केला आहे. रॉबर्ट अब्राम्स यांच्या या दाव्यानंतर प्रिगोझिन यांची हत्या झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अब्रास यांनी एबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाटो शिखर परिषद आणि युक्रेनमधील संघर्ष यासारख्या विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना प्रिगोझिन जिवंत आहेत का हा प्रश्न विचारण्यात आला होता. “मला विश्वास आहे की आपण प्रिगोझिन आता सार्वजनिकपणे पुन्हा कधीच पाहणार नाही. मला वाटते एकतर तो अज्ञातवासात गेला आहे, किंवा त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे किंवा त्याला मारण्यात आले आहे. मला वाटत नाही की तो जिवंत आहे आणि तो असेल तर तो कुठेतरी तुरुंगात आहे,” असे रॉबर्ट अब्राम्स म्हणाले.

रशियाविरुद्धच्या अयशस्वी बंडानंतर काही दिवसांपूर्वीच रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने क्रेमलिनच्या वतीने सांगितले होते की पुतिन आणि प्रिगोझिन यांची 29 जून रोजी भेट झाली होती. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याला दुजोरा दिला होता. या भेटीचा संदर्भ देत अब्राम यांनी दावा केला की, ‘या भेटीचा कोणताही पुरावा दिसला तर मला आश्चर्य वाटेल. मला वाटते की भेट खोटी आहे.

काय झालं त्या भेटीत?

पुतिन यांनी कॉमर्संट या वृत्तपत्राला 29 जून रोजी झालेल्या त्यांच्या भेटीविषयी सांगितले होते. यामध्ये आर्मी ग्रुप वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांच्यासह 35 वॅगनर कमांडर उपस्थित होते. प्रिगोझिन आणि त्यांच्या सैन्याने मॉस्को अधिकाऱ्यांविरुद्ध बंड केल्यानंतर पाच दिवसांनी ही बैठक झाली होती. या बैठकीत राष्ट्रपतींनी युक्रेनच्या युद्धात वॅग्नर ग्रुपच्या भूमिकेचे कौतुक केले. पुतिन यांनी वॅग्नर कमांडर्सचे म्हणणे ऐकले आणि त्यांना पुन्हा नोकरीची संधी दिली, असा दावाही करण्यात येत आहे. प्रीगोझिन यांनी संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि जनरल स्टाफ चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना काढून टाकण्याची मागणी केली, पण दोघेही पदावर कायम आहेत.

Related posts