( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kedarnath Temple : गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त व्हिडिओंमुळे चर्चेत आलेल्या केदारनाथ मंदिर (Kedarnath Temple) प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन (Mobile Ban) घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील सूचना फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई असून तुम्ही सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या सूचना फलकांमध्ये सांगण्यात आले आहे.
केदारनाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणाई जात असते. काही दिवसांपूर्वी एका महिला ब्लॉगरने मंदिर परिसरात वादग्रस्त व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याचे समोर आले होते. त्यात एका तरुणीने त्याच्या प्रियकराला मंदिरासमोर लग्नासाठी मागणी घातली होती. यानंतर मंदिर समितीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर आता भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत आणि व्हिडिओ बनवता येणार नाहीत. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.
यासोबतच भाविकांना सभ्य कपडे घालून मंदिरात येण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरात मंडप किंवा छावण्या न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. असे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या फलकांवर स्पष्टपणे लिहिले आहे. केदारनाथ मंदिरात बनवलेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले होते, ज्याबद्दल यात्रेकरू, सामान्य भाविक आणि सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला होता आणि धार्मिक स्थळांमधील अशा कृत्यांचा निषेध केला होता.
काही दिवसांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वीच भाविकांचे मोबाईल बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता संपूर्ण मंदिर परिसरातच मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “हे एक धार्मिक ठिकाण आहे, जिथे लोक मोठ्या श्रद्धेने येतात. त्यामुळे भाविकांनी त्याचा आदर केला पाहिजे. बद्रीनाथ धाममधून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, पण तेथेही असे फलक लावले जातील,” असे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी स्पष्ट केले.