एलॉन मस्क यांना बसला 1640,08,10,00,000 रुपयांचा फटका; जाणून घ्या नक्की घडलं तरी काय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Elon Musk Loses 20 Billion USD In One Day: सतत चर्चेत असलेली व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांना ओळखलं जातं. ट्वीटरच्या मालकी हक्कापासून स्पेस एक्सपर्यंत अनेक विषयांमुळे मस्क या ना त्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा सोशल मीडियावर त्यांचं रोखठोकपणे व्यक्त होणंही बातम्यांचा विषय ठरतं. मात्र इतर कंपन्यासंदर्भात काहीही असलं तरी मस्क यांची खरी ओळख टेस्ला कंपनीच आहे. मस्क यांचं सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचं गणित हे थेट त्यांच्या टेस्ला कंपनीशी निगडीत असल्याचं मागील आठवड्यात पुन्हा एकदा सिद्ध झालं.

किती फटका बसला?

मस्क यांची संपत्ती मागील आठवड्यामध्ये गुरुवारी तब्बल 20.3 बिलिअन अमेरिकी डॉलर्सने कमी झाली. भारतीय चलनानुसार सांगायचं झाल्यास मस्क हे एका दिवसात 1640,08,10,00,000 म्हणजे 1640 अब्ज 8 कोटी 10 लाख रुपयांचा फटका मस्क यांना बसला. मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी गडगडल्याने त्यांना हा फटका बसला. या पडझडीचा अर्थ टेस्ला (Tesla Shares) कंपनीने आपल्या गाड्यांची किंमत कमी करणं धोक्याचं ठरु शकतं असं म्हटलं जात आहे.

टेस्लाचे शेअर्स गडगडले

टेस्लाचे शेअर्स गुरुवारी 9.7 टक्क्यांनी कोसळले. नॅसडॅक (अमेरिकी शेअर मार्केटमध्ये) टेस्लाच्या शेअर्सचे दर 262.90 अमेरिकी डॉलर्सपर्यंत खाली आले. टेस्लाच्या नफ्यामध्ये वेगाने घट होत असतानाच भविष्यात अशाप्रकारेच आणखीन धक्के बसू शकतात असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. व्याजदर वाढत असेल तर कंपनी कार्सची किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न करेल असं यापूर्वीच टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मस्क यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतरच शेअर्सची मागणी कमी झाल्याने ही पडझड झाल्याचं सांगितलं जात आहे.

श्रीमंताच्या यादीतील अंतर झालं कमी

एका दिवसात 20.3 बिलिअन अमेरिकी डॉलर्सने मस्क यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याने मस्क आणि जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बर्नार्ड अरनॉल्ट यांच्यामधील संपत्तीचं अंतर कमी झालं आहे. बर्नार्ड यांची एकूण संपत्ती 201 बिलिअन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. तर मस्क यांची संपत्ती 234 बिलिअन अमेरिकी डॉलर्स आहे.

सर्वांनाच बसला फटका

या पडझडीचा फटका केवळ मस्क यांना बसलेला नाही तर अ‍ॅमेझॉनचे जेफ बोझेस, ओरॅकलचे लॅरी एलीसन, मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बल्मार, मेटाचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग आणि अल्फाबेटचे सहसंस्थापक लेरी पेज आणि स्रीगी ब्रीन यांच्या संपत्तीमध्ये एकूण 20.8 बिलिअन अमेरिकी डॉलर्सची घट झाली. नॅसडॅमध्ये 100 अंकांहून अधिक पडझड झाली. ही पडझड 2.2 टक्के इतकी होती.

Related posts