भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण; 5 ठार आणि 3 जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अमेरिकेत एका घऱात भीषण स्फोट होऊन 5 जण ठार झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची तीन घरांचंही त्यात नुकसान झालं आहे. हा स्फोट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातून तो किती भयानक होता याची कल्पना येत आहे. शनिवारी सकाळी पिट्सबर्गच्या बाहेरील निवासी उपनगरात ही घटना घडली. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका घरातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या या स्फोटात घराच्या अक्षरश: चिंधड्या उडत असल्याचं दिसत आहे. 

ट्विटरला या स्फोटाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसत आहे त्यानुसार, स्फोटानंतर आगीचा एक मोठा गोळा हवेत दिसत असून त्यानंतर आजुबाजूच्या घरांवर त्याचे तुकडे पडत आहेत. “पेनसिल्व्हेनियामध्ये एका घरात झालेल्या स्फोटानंतर चार व्यक्ती आणि एका मुलाचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या घरांमधील तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामधील एकाची प्रकृती सध्या गंभीर आहे,” अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, प्लम समुदायाचे पोलिस प्रमुख, लॅनी कॉनली यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 10.30 च्या आसपास स्फोटानंतर चार नागरिक आणि एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. स्फोटाची माहिती देणाऱ्यांना ढिगाऱ्याखाली काही अडकलेले लोक सापडले. तीन लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमधील तिघांपैकी दोघांना उपचारानंतर सोडण्यात आलं आहे. एकाची प्रकृती सध्या गंभीर आहे अशी माहिती अॅलेगेनी काउंटीचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा उपसंचालक स्टीव्ह इम्बार्लिना यांनी दिली आहे.
 
पेनसिल्व्हेनियाच्या अॅलेगेनी काउंटीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एक घरात स्फोट झाला आणि इतर दोन घरांना त्याची झळ बसली. खिडक्या उडाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे”.

दरम्यान स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अधिकारी सध्या याचा तपास करत आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, तपासाची ही प्रक्रिया फार संथ आणि मोठी असल्याने त्यासाठी महिने किंवा वर्षंही लागू शकतं. 

सध्या, परिसरात गॅस आणि इलेक्ट्रिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत. CNN नुसार, रेड क्रॉस आणि सॅल्व्हेशन आर्मी देखील स्फोटामुळे प्रभावित झालेल्या रहिवाशांना मदत करत आहेत, असे काउंटीने सांगितले.

 

Related posts