( प्रगत भारत । pragatbharat.com)
दिल्ली पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, ज्याने चोरीच्या पैशांमधून करोडोंची संपत्ती खरेदी केली आहे. फक्त चोरी करत त्याने दिल्लीपासून ते नेपाळपर्यंत आपली संपत्ती उभी केली आहे. या आरोपीने राजधानीत 200 पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत. त्याला पोलिसांनी याआधी 9 वेळा अटक केली होती. पण त्यावेळी त्याने खोटं नाव सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची माहिती मिळाली नव्हती.
पोलिसांनी सांगितलं आहे की, सिद्धार्थ नगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस सुरु केलं आहे. तसंच नेपाळमध्ये हॉटेल चालवत आहे. इतकंच नाही तर फक्त चोरी करत त्याने लखनऊ आणि दिल्लीत बंगले उभे केले आहेत. 2001 ते 2023 पर्यंत त्याच्यावर 15 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घराचोरीच्या आरोपाखाली एका करोडपती हॉटेल व्यावसायिकाला अटक केली आहे. मनोज चौबे अशी या चोराची ओळख पटली आहे. तब्बल गेल्या 25 वर्षांपासून हा चोर आपली ओळखत लपवत दोन वेगवेगळी आयुष्य जगत आहे. आरोपीने एकट्याने 200 चोऱ्या केल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये राहायचं आरोपीचं कुटुंब, नेपाळमध्ये स्थलांतर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय मनोज चौबेचं कुटुंब नेपाळपासून जवळ असणाऱ्या उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगरमध्ये राहत होतं. पण नंतर हे कुटुंब नेपाळमध्ये वास्तव्य करण्यास गेलं. मनोज 1997 मध्ये दिल्लीत आला आणि किर्तीनगरमधील कँटीनमध्ये काम करु लागला. पण यावेळी चोरी केल्याने त्याला पकडलं आणि जेलमध्ये पाठवलं. जेलमधून बाहेर पडल्यानंतर तो घरांना लक्ष्य करु लागला. यावेळी मोठी रक्कम हाती लागल्यानंतर तो आपल्या गावी परतत असे.
आरोपी मनोज सुरुवातीला भाड्याच्या घऱात राहून चोरी करायचा. यासाठी तो परिसराची रेकी करत असे. यानंतर मॉडल टाऊन, रोहिणी, अशोक विहार आणि पीतमुरा येथे बंद पडलेल्या कोठी, बंगले आणि फ्लॅट यांना लक्ष्य करत असे.
दिल्लीत पार्किंगची कंत्राटदारी करत असल्याची खोटी बतावणी
चोरीच्या रकमेने आरोपी मनोजने नेपाळमध्ये हॉटेल उभं केलं होतं. यादरम्यान, त्याने उत्तर प्रदेशातील जलसिंचन विभागातील अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केलं. सासरी त्याने आपण दिल्लीत पार्किंगची कंत्राटदारी करत असल्याची खोटी माहिती दिली होती. यासाठी मला सहा ते आठ महिने दिल्लीत राहावं लागत असल्याचंही त्याने सांगितलं होतं.
सिद्धार्थ नगरच्या शोहरतगढ येथे त्याने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस उभं केलं होतं. याशिवाय मनोजने रुग्णालयासाठी जमीन लीजवर दिली होती. ज्यासाठी त्याला महिन्याला 2 लाख रुपये भाडे मिळत होतं.
आरोपी मनोजने लखनऊत कुटुंबासाठी घर बांधलं होतं. करोडोंची संपत्ती आणि लाखोंचं भाडं मिळत असतानाही मनोज दिल्लीत चोरी करत होता.
एका चोरीप्रकरणी पीडितने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं असता त्यात मनोजचा चेहरा दिसला. यानंतर चोरी झालेली स्कुटी घेऊन तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचं दिसलं. पोलिसांनी स्कुटीचा नंबर तपासला असता ही विनोद थापाच्या नावे असल्याचं समोर आलं. पोलिसांनी चौकशी केली असता, विनोद याने आपले भावोजी गाडी घेऊन फिरत असल्याचं सांगितलं. यावेळी मनोजने एका नेपाळी तरुणीशी लग्न केलं असून, तिला दिल्लीत लपवून ठेवल्याचंही समोर आलं. यानंतर पोलिसांनी मनोजला बेड्या ठोकल्या.