2024 मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल? INDIA च्या बैठकीआधीच AAP ची मोठी मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Modi Vs Kejriwal 2024: लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA कडून लढवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र मोदींविरोधात कोण लढणार असा प्रश्न विचारला जात असतानाच आता 2024 ची लढाई मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी होते की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे. ही या आघाडीची तिसरी बैठक आहे. या बैठकीपूर्वीच आम आदमी पार्टीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वसर्वा केजरीवाल यांना विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची मागणी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

केजरीवाल का हवेत पंतप्रधान पदाचे उमेदवार?

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी ही मागणी केली आहे. “तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतंय की अरविंद केजरीवाल पंतप्रधान पदाचे उमेदवार होतील. एवढी महागाई असतानाही दिल्लीमध्ये महागाईचा दर तुलनेनं कमी आहे,” असं कक्कर यांनी म्हटलं. तसेच त्यांनी दिल्लीमध्ये पाणी, वीज, शिक्षण, महिलांसाठी बस प्रवास मोफत आहे. वयस्कर व्यक्तींसाठी तीर्थयात्रेची सुविधाही मोफत देण्यात आली असतानाही दिल्ली सरकारने नफ्यातील अर्थसंकल्प सादर केल्याचा उल्लेख कक्कर यांनी यावेळेस केला. केजरीवाला वारंवार लोकांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत आले आहेत. पंतप्रधान मोदींना आव्हान देणारे नेते म्हणून ते मागील काही काळात पुढे आले आहेत. त्यांनी अनेकदा उघडपणे आपली भूमिका मांडताना रोकठोक मतं व्यक्त केली आहेत, असं कक्कर यांनी सांगितलं.

सध्याचं सरकार नकारात्मक

मेक इंडिया नंबर 1 मोहिमेअंतर्गत अनेक गोष्टींची निर्मिती देशातच व्हावी असी आमची इच्छा आहे. जेव्हा आपण सामान आयात करतो तेव्हा महागाईही आयात करतो असं पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन म्हटलं होतं. आपल्या देशाबरोबर हे असं का होत आहे तर त्यांच्याकडे (सध्याच्या सरकारकडे) अर्थविषयक धोरण नसल्याने निर्मितीबाबतीत सरकार नाकारात्मक आहे, असं कक्कर म्हणाल्या.

मोदी सरकारने हजारो कोटी माफ केले

केजरीवाल यांच्या व्हिजननुसार भारत हा निर्मितीचं केंद्र ठरेल. तेव्हा देशातील लायसन्स राज संपुष्ठात येईल. व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापार करता येईल. तसेच उच्च शिक्षण दिलं जाईल आणि मुलं नवीन विचार करु लागतील. भारतामधील शिक्षण व्यवस्था अशी असेल की परदेशातील विद्यार्थी डॉलर खर्च करुन इथं शिक्षणासाठी येतील. मोदी सरकारने काही व्यापाऱ्यांचे हजारो कोटी माफ केले. एवढ्या पैशांमध्ये किती राज्यांमध्ये किती वीज मोफत वाटता आली असती याचा विचार करा, असंही कक्कर म्हणाल्या.

सर्वजण मिळून निर्णय घेणार

प्रियंका कक्कर यांच्या विधानावर आपचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रत्येक पक्षाला वाटतं की त्यांच्या नेत्याने पंतप्रधान व्हावं. आम आदमी पार्टीलाही हेच वाटतं की आमचे नेत पंतप्रधान व्हावेत. मात्र I.N.D.I.A आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हे एकत्र ठरवलं जाईल, असं गोपाल राय यांनी सांगितलं. काँग्रेसच्या I.N.D.I.A आघाडीच्या पोस्टवर अरविंद केजरीवाल यांचा फोटो नसल्याचा मुद्दा शुल्लक असून अशा गोष्टी घडत असतात असंही राय यांनी सांगितलं.

यंदाची बैठक अधिक महत्त्वाची

I.N.D.I.A आघाडीची पहिली बैठक जून महिन्यात पाटण्यात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात बंगळुरुमध्ये दुसरी बैठक झाली. आता मुंबईत तिसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये I.N.D.I.A आघाडीचे संयोजक कोण असतील इथपासून ते जागा वाटापासंदर्भातील चर्चाही होण्याची शक्यता असल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

Related posts