( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : लग्नाचा पहिला वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो आणि त्याला आणखी स्मरणीय करण्यासाठी पती पत्नी एकमेकांना काही भेट (Wedding Anniversary Gift) तर नक्कीच देत असतात. मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका माजी नेत्याने पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी असं काही गिफ्ट दिलं की एकच गोंधळ उडाला आहे. तृणमूलचे माजी नेते रियाझुल हक (Riazul Haque) यांनी त्यांच्या पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक एके-47 रायफल (AK-47 Rifle) भेट दिली आहे. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र टीका होऊ लागल्यानंतर रियाझुल हक यांनी ती खेळण्यातील वस्तू असल्याचं सांगितलं आणि नंतर पोस्टही डिलीट केली.
तृणमूलचे माजी नेते रियाजुल हक यांनी त्यांच्या पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक-47 रायफल भेट दिल्याने एकच खळबळ उडाली होती. रियाजुल यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवासानिमित्त पत्नी सबिना यास्मिनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांच्या पत्नीने हातात एके-47 रायफल पकडलेली होती. फोटो व्हायरल होताच भाजप आणि सीपीआयएमच्या नेत्यांनी रियाजुल यांच्यासह तृणमूलवर निशाणा साधला. वाढता विरोध पाहता रियाजुल हक यांनी फोटो असलेली पोस्ट डिलीट करुन टाकली.
रियाझुल हक हे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहेत. सोमवारी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यांनी पत्नी सबिना यास्मिन यांना भेट म्हणून रायफल भेट दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रियाझुल यांच्या पत्नीने रायफल हातात घेतल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर होताच वादाला तोंड फुटले. हा फोटो अनेक स्थानिक भाजप नेत्यांनीही शेअर केला आहे. आपल्या कृत्याचा बनाव करताना रियाजुल यांनी सांगितले की,’पत्नीकडे ‘टॉय गन’ होती. ती खरी एके-47 रायफल नव्हती. आम्ही काहीही बेकायदेशीर केलेले नाही. माझ्या पत्नीच्या हातात टॉय गन होती. माझ्यावरील आरोप खोटे आहेत.’
भाजपची चौकशीची मागणी
भाजपने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “रियाझुलने ही बंदूक कुठून आणली, याचा तपास व्हायला हवा. मी त्याची फेसबुक पोस्ट पाहिली आहे. ते माजी तृणमूल नेते आणि राज्याचे उपसभापती यांचे निकटवर्तीय आहेत. यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे? हे तालिबान राजवटीला चालना देत नाही का? हे पुढच्या पिढीला जिहादी होण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहेत का?,” असा सवाल बीरभूमचे भाजप जिल्हाध्यक्ष ध्रुबो साहा यांनी केला आहे.
रियाझुल हक हे माजी तृणमूल नेते उपसभापती आणि रामपुरहाटचे आमदार आशिष बंदोपाध्याय यांच्या जवळचे मानले जातात. रियाजुल हे एकेकाळी तृणमूलच्या अल्पसंख्याक सेलच्या रामपुरहाट-1 ब्लॉकचे अध्यक्ष होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, एके-47 रायफल्स बहुतेक लष्करी आणि निमलष्करी कारवाई दरम्यान वापरली जाते. एके-47 ची गोळी वर्मी लागलेला माणूल वाचणे अवघड असते. साधी पण मजबूत रचना, हाताळण्यासही सुलभ आणि कोणत्याही वातावरणात चालणारी अशी एके-47ची वैशिष्टे आहेत. मात्र जेव्हा लोकांनी टीएमसीच्या माजी नेत्याच्या पत्नीच्या हातात हे शस्त्र पाहिले तेव्हा ते चांगलेच संतापले आहेत.