world news india canada dispute on khalistan ministry of external affairs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Canada: कॅनाडात गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरोधात खलिस्तानी (Khalistani) आक्रमक झालेत. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ले केले. भारताविरोधात मोर्चे काढले. मात्र कॅनडातील (Canada) जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) सरकारनं कोणतीही कारवाई केलेली नाही. यालट खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर तिथल्या सरकारनं भारतावर बेछूट आरोप सुरू केलेत. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील तणाव प्रचंड वाढलाय. वाढत्या तणावावर भारताच्या परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत कॅनडाच्या आरोपांना चोख उत्तर दिलं. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि त्याला पाकिस्तान पाठिंबा देत असल्याचा आरोप भारताने केलाय. निज्जर यांच्या मृत्यूनंतर कॅनडाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचं प्रवक्ता अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी म्हटलं. वॉन्टेड दहशतवादी आणि गुन्हेगारांना ताब्यात देण्याची मागणीही भारताने केली आहे. 

भारतविरोधी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी आयएसआयने कॅनडातल्या खलिस्तानी गटांना बळ द्यायला सुरूवात केलीय. कॅनडात एका गुप्त जागी आयएसआय आणि खलिस्तानी गटांची बैठक झाल्याची माहिती समोर येतेय. भारताविरोधी कारवाया आणखी जोरात आखण्यासाठी आयएसआयने ‘प्लॅन के’ तयार केलाय. खलिस्तानी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात फंडिंग केलं जातंय. गेल्या काही महिन्यात प्रचंड पैसा खलिस्तानी नेत्यांना ट्रान्सफर झालाय. विविध ठिकाणी खलिस्तानी आंदोलनं, तरूणांची भरती, पोस्टरबाजी, बॅनरबाजी यासाठी हा पैसा वापरला जातोय. भारताला मोस्ट वाँटेड असलेले जवळपास 20 हून अधिक खलिस्तानी दहशतवादी सध्या कॅनडात लपलेत. त्यांना एकत्र करून भारताविरोधात कारवाया करण्याचा आयएसआयचा कट आहे. 

कॅनडामध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती तिथल्या सरकारला देण्यात आली होती. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोपही भारताने केलाय. दहशतवाद्यांसाठी कॅनडा हे सुरक्षित आश्रयस्थान देश बनला आहे असंही अरिंदम बागची यांनी म्हटलंय. कॅनडातील व्हिसा सेवा बंद करण्याच्या निर्णयावर अरिंदम बागची यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कॅनडामधील भारताच्या उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना धमक्या दिल्या जात होत्या.  कॅनडातून भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आलीय. गेल्या तीन दिवसांत भारतानं कॅनडावर कडक कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. भारतानं कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांचीही हकालपट्टी केलीय. कॅनडानं निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताविरोधात पुरावे द्यावेत असं थेट आव्हान परराष्ट्र मंत्रालयानं दिलंय. 

कॅनडातील बहुतांश भागांमध्ये भारतविरोधी कारवाया सुरू आहेत. त्यामुळे भारतीयांनी कॅनडात प्रवास करताना सावधानता बाळगावी, तिथं शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनीही सतर्क राहावे, अशा सूचना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालयानं आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. भारतानं कॅनडाला धडा शिकवण्यासाठी अॅक्शन प्लानही तयार केलाय. 

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIमार्फत खलिस्तानी दहशतवाद्यांना पैसा पुरवाला जात असल्याचा भारतीय गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. मात्र तिथलं ट्रुडो सरकार खलिस्तान्यांच्या भीतीपोटी बोटचेपी भूमिका घेतंय. त्यामुळे आता भारतानं कॅनडाला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतलीय. 

Related posts