( प्रगत भारत । pragatbharat.com)
कॅनडियन (Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंग (Punjabi singer Shubh) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेला 26 वर्षीय शुभनीत मात्र त्याच्या एका पोस्टमुळे वादात सापडला आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान शुभनीतवर (Shubhneet Singh) खलिस्तानींना (Khalistan) पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मुंबईत होणारा त्याचा मोठा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली, केएल राहुल यासारख्या दिग्गजांनी त्याला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. वाढता विरोध पाहता शुभनीतने या सगळ्यावर आपलं मौन सोडलं आहे. शुभनीतने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे.
भारतातील त्याचे शो रद्द झाल्यानंतर पंजाबी गायक शुभने त्याच्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. “भारत माझाही देश आहे. माझा जन्म येथे झाला आहे. ही माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजांची भूमी आहे,” असे शुभनीत सिंगने म्हटलं आहे. खलिस्तानी गटांना पाठिंबा दिल्याचा आणि भारताचा चुकीचा नकाशा पोस्ट केल्याबद्दल शुभचे भारतातील शो रद्द करण्यात आले आहेत. इंन्स्टाग्रामवरील सोशल मीडिया पोस्टमध्ये, शुभने आपण निराश झाल्याचे म्हटलं आहे. भारतातील पंजाबमधील एक तरुण रॅपर-गायक म्हणून माझे संगीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणणे हे माझे आयुष्याचे स्वप्न होते. पण अलीकडच्या घडामोडींमुळे माझी मेहनत आणि प्रगती कमी झाली आहे. माझे दु:ख व्यक्त करण्यासाठी मला काही बोलायचे होते. माझा भारत दौरा रद्द झाल्याने मी अत्यंत निराश झालो आहे,” असे शुभनीतने म्हटलं आहे.
माझ्या देशात, माझ्या लोकांसमोर परफॉर्मन्स करण्यासाठी मी खूप आनंदी आणि उत्साही होतो. तयारी जोरात सुरू होती आणि मी गेले दोन महिने मनापासून सराव करत होतो. पण मला वाटते की नियतीने आणखी काही वेगळंच ठरवलं होतं, असेही शुभनीतने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथेच झाला. ही माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजांची भूमी आहे, ज्यांनी या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या वैभवासाठी आणि कुटुंबासाठी त्याग करण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही. पंजाब माझा आत्मा आहे, पंजाब माझ्या रक्तात आहे. आज मी जो काही आहे तो पंजाबी असल्यामुळे आहे. पंजाबींना देशभक्तीचा दाखला देण्याची गरज नाही. इतिहासाच्या प्रत्येक वळणावर पंजाबी लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की प्रत्येक पंजाबीला फुटीरतावादी किंवा देशद्रोही असे नाव देण्याचे टाळावे,” असेही आवाहन शुभनीतने केलं आहे.
कोण आहे शुभ?
शुभला म्युझिक इंडस्ट्रीतील एक उगवता तारा मानले जाते. कॅनडामध्ये स्थायिक झालेला शुभ हा मुख्यतः पंजाबी संगीत उद्योगाचा एक भाग आहे. वी रोलिन या अल्बमने त्याला तुफान प्रसिद्धी मिळाली होते. भारत आणि कॅनडा व्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्यांचे मोठे फॉलोअर्स आहेत.