( प्रगत भारत । pragatbharat.com)
पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमधील स्थिती अद्यापही सुधारत असल्याचं चित्र नाही. पाकिस्तानमध्ये महागाई पुन्हा एकदा गगनाला भिडू लागली असून, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर 2023 मध्ये 30 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने 3 अरब डॉलर्सचं बेलआऊट पॅकेज मंजूर केल्यानंतरही सरकारला देशातील महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश आलं आहे.
पाकिस्तानात वार्षिक महागाई दर सप्टेंबरमध्ये 31.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी मागील ऑगस्ट महिन्यात तो 27.4 टक्के होता. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलचा दर आणि ऊर्जेची किंमत वाढल्याने महागाई वाढली आहे. देशातील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पाकिस्तानवर मागील काही काळात दिवाळखोरीचं संकट होतं. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 3 अरब डॉलर्सचं पॅकेज जाहीर करत देशाला दिवाळखोर होण्यापासून वाचवलं होतं. यावेळी आयएमएफने पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या होत्या. ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा उल्लेख होता. त्यानुसार, सरकार इंधनांच्या किंमतीत सतत वाढ करत आहे. याचा प्रभाव महागाईच्या दरावर होत अशून, ती वाढत चालली आहे. मे महिन्यात पाकिस्तानचा महागाई दर 38 टक्क्यांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचली होती. पॉलिसी रेटही 22 टक्क्यांच्या सर्वाधिक उंचीवर गेला आहे.
दरम्यान महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल झाले आहेत. देशात महागाई किती वाढली आहे याचा अंदाज पेट्रोल-डिझेलचे दर आणि एलपीजी सिलेंडरच्या किंमतीवरुनच लावू शकतो. पाकिस्तानात पेट्रोल 331.38 रुपये प्रती-लिटर आणि डिझेल 329.18 रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. तर एलपीजी 260398 रुपये प्रती किलो झाला आहे. घऱगुती सिलेंडरसाठी तर तब्बल 3079.64 रुपये मोजावे लागत आहेत.
भारताच्या तुलनेत 5 पट महागाई
पाकिस्तानातील महागाईची भारताशी तुलना केल्यास ती पाचपटीने जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर (सीपीआय) जुलैमध्ये 7.44 टक्क्यांच्या तुलनेत 6.83 टक्क्यांवर आला होता. सप्टेंबर महिन्याची आकडेवारी काही दिवसांत जाहीर होणार आहे. तथापि, हा आकडा अजूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) निर्धारित केलेल्या 6 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात अन्नधान्य महागाई दरात घट झाली असून ती 10 टक्क्यांच्या खाली जाऊन 9.94 टक्क्यांवर आली आहे, जी जुलैमध्ये 11.51 टक्के होती. देशातील चलनवाढ आरबीआयच्या मर्यादेपेक्षा जास्त असली तरी ती पाकिस्तानच्या तुलनेत खूपच कमी आहे.